कोरोना काळात मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी खरे कर्मयोगी – महापौर

कोरोना काळात मृतदेहावर अंत्यसंस्कार  करणारे कर्मचारी खरे कर्मयोगी – महापौर

कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांनी खूप महत्त्वाचे काम बजावले होते. त्याचप्रमाणे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला. या मृतदेहांवर पालिका स्मशानभूमी व कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे काम करणारे महापालिकेचे कर्मचारी हे खरे कर्मयोगी आहेत. त्यांच्या या कार्याला माझा सलाम आहे, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे. दक्षिण मुंबईतील स्मशानभूमी – कब्रस्थान मध्ये अविरतपणे कर्तव्यनिष्ठ काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. गोल देऊळ कुंभारवाड्याच्या श्री राम मंदिरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

स्मशानभूमी- कब्रस्तानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ तसेच भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळामध्ये सर्वप्रथम लॉकडाउन जर कोणी केली असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांनी केले. त्यासोबतच धीरगंभीर व शांततेने धाडसाचे निर्णय घेतले. कोरोनाच्या नावाने ज्यावेळी पोटात भीतीचा गोळा उठत होता, त्यावेळी ही सर्व मंडळी अविरतपणे कार्य करीत असल्याचे महापौरांनी सांगितले.

कोरोना काळात महापौर म्हणून मुंबईतील अनेक स्मशानभूमी -कब्रस्थान यांना भेटी दिल्या. याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. आज याठिकाणी होत असलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार हा प्रातिनिधिक स्वरूपातील जरी असला तरी संपूर्ण मुंबईतील स्मशानभूमी- कब्रस्थान व इतर धर्मियांच्या स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करून त्या सर्वांचा सत्कार करणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले. मृत व्यक्तींवर होणारे संस्कार या सर्व मंडळींच्या मदतीने आपण करीत असून न घाबरता ही मंडळी सत्कर्म करीत असतात. यापुढेही आपण असेच अखंड सेवाव्रत चालू ठेवावे. त्यासोबतच या प्रकारचे कार्यक्रम सुरू ठेवावेत, असे महापौरांनी म्हटले आहे.


हेही वाचा – कुर्ला येथे रंगाच्या कारखान्यात भीषण आग ; गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ३ जण जखमी

 

 

First Published on: January 19, 2021 10:12 PM
Exit mobile version