वांद्रे येथे उबेर कारच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

वांद्रे येथे उबेर कारच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

वांद्रे येथे उबेर कारच्या धडकेने अनिस इसाक मंसुरी या 27 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला तर राबीत खलिफा हा तरुण गंभीररीत्या जखमी झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला असून त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्‍या तरुणाला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आरोपी कारचालकाचा आता पोलीस शोध घेत आहेत. हा अपघात रविवारी पावणेचार वाजता वांद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील वाकोला ब्रिजवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दानिश इसाक मंसुरी हा नागपाडा परिसरात राहत असून मृत अनिस हा त्याचा भाऊ आहे. रविवारी अनिस हा त्याचा मित्र राबितसोबत त्याच्या बाईकवरुन नागपाड्याच्या दिशेने जात होते. ही बाईक वाकोला ब्रिज, दक्षिण वाहिनीवरुन जात असताना भरवेगात जाणार्‍या एका सुझकी वॅगनार उबेर कारने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. या अपघातात ते दोघेही जखमी झाले होते. अपघातानंतर दोन्ही जखमींना वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता कारचालक तेथून पळून गेला होता.

ही माहिती मिळताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी अवस्थेत राबीत आणि अनिसला पोलिसांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे अनिसला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर राबितची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर तिथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दानिशच्या तक्रारीवरुन खेरवाडी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन पळून गेलेल्या कारचालकाचा शोध घेत आहेत

First Published on: February 19, 2019 4:08 AM
Exit mobile version