इर्ला पंपिंग स्टेशनला जोडणार्‍या नाल्यावरील अतिक्रमणे साफ

इर्ला पंपिंग स्टेशनला जोडणार्‍या नाल्यावरील अतिक्रमणे साफ

इर्ला पंपिंग स्टेशनला जोडणार्‍या जुहूतील मोरा गावमधील नाल्यावरील वादातील अतिक्रमण हटवण्यात महापालिकेच्या के/पश्चिम विभागाच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. मागील अनेक महिन्यांपासून येथील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेच्यावतीने कारवाई केली जात होती. परंतु कारवाई केल्यानंतर पुन्हा त्या जागी झोपड्या उभारल्या जात होत्या. परंतु शुक्रवारी महापालिकेच्या के/पश्चिम विभागाच्या अधिकार्‍यांनी या झोपड्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करत सर्व कुटुंबांना बाहेर हुसकावून लावत त्यावर त्वरीत जाळी बसवण्याची प्रक्रिया हाती घेतली. त्यामुळे या मोकळ्या झालेल्या भूखंडावर आता महापालिकेच्यावतीने यावर मियावकी पध्दती उद्यान विकसित केली जाणार आहे.

इर्ला नाला पंपिंग स्टेशनला जोडणार्‍या नाल्यालगतच्या भूखंडावर मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून नाल्यालगतचा भाग मोकळा करण्यासाठी महापालिकेच्यावतीने धडक कारवाई हाती घेण्यात आली होती. परंतु त्याला यश येत नव्हती. त्यामुळे के/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुन्हा एकदा धडक कारवाई आली. यामध्ये तब्बल ५० झोपड्या आणि १५ पक्क्या बांधकामांवर कारवाई करून जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत. तसेच येथील सर्व कुटुंबांना तेथून दूर हाकलून या भूखंडाचा ताबा महापालिकेने घेतला आहे. तब्बल साडेचार एकरचा हा भूखंड असून झोपड्या तसेच बांधकाम हटवून मोकळ्या झालेल्या या जागेवर मियावकी पध्दतीने उद्यान विकसित करण्यात येणार असल्याची माहिती के/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.

याठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकामे हटवून त्यावर महापालिकेच्यावतीने उद्यान विकसित करण्याची मागणी स्थानिक आमदारांनी केली होती.या सर्व बांधकामांविरोधात तब्बल पाच वेळा स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

First Published on: February 29, 2020 3:59 AM
Exit mobile version