मानवसृष्टीचा अंत लवकरच

मानवसृष्टीचा अंत लवकरच

प्रातिनिधिक छायाचित्र

मानवाच्या आणि संपूर्ण सजीव सृष्टीचा अंत समय अगदी जवळ येऊन ठेपला आहे. आणि त्यास माणूसच कारणीभूत आहे. जगभरातल्या काही मोजक्या कंपन्यांच्या हातात सर्व जगाच्या नाड्या एकवटल्या असून त्यांना स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या पलीकडे कशाचीही पर्वा नाही. कर्बवायूचे अनाठायी, अतिरेकी उत्सर्जन आणि त्यामुळे होणारी उष्मावाढ सृष्टीचा नाश होत आहे, अशी भिती पर्यावरणवादी पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी पालघर येथील माहिम वडराई येथे बोलताना व्यक्त केली.

सहाव्या स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण पाटील स्मृती व्याख्यानमालेत बोलताना देऊळगावकर यांनी उष्मावाढ होत असून सृष्टीचा नाश कशापद्धतीने होत आहे, हे स्लाइड्सद्वारे प्रभावी पद्धतीने मांडले. अ‍ॅमेझॉनचे जंगल आणि उत्तर ध्रुवाकडील जंगलाला लागलेल्या, लावलेल्या आगीतून जगभर हवामानाचे किती भयंकर नुकसान झाले आहे, हे सांगत असतानाच अनेक देशातून याविरोधात काम करणार्‍या विचारवंतांचाही त्यांनी मागोवा घेतला. ग्रेटा थुनबर्ग आणि जगभरातील शालेय मुलांनी केलेल्या आंदोलनाची त्यांनी सखोल माहिती दिली.

पर्यावरणवादी पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी माहिम वडराई येथील व्याख्यानमालेत उपस्थितांना मार्गदर्शन केले

व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी बदलत्या हवामानात कशी आणि कोणत्या प्रकारची शेती केली पाहिजे याचेही विवेचन केले. अगदी दहा गुंठे जमिनीतही कुटुंबास पुरेल असे उत्पादन कसे घेता येईल, काचेची शेती कशी केली जाते हे सर्व स्लाइड्सच्या साहाय्याने स्पष्ट केले. त्यांच्या या क्लिष्ट विषयाच्या अत्यंत अभ्यासपूर्ण तरीही सर्वांना समजेल अशा सोप्या मांडणीमुळे सर्व उपस्थित मंत्रमुग्ध झाले. भविष्यात येणार्‍या धोक्याची सविस्तर कल्पना देऊन आपण काय करणे गरजेचे आहे हे सांगून त्यांनी गांधीजींनी कित्येक वर्षांपूर्वी या सर्व संकटांचा कसा विचार केला होता, काय उपाय सुचवले होते हे स्पष्ट केले. गांधी या महामानवाचे महत्व विषद करून कुमार गंधर्वांच्या गांधींवरील एका पदाने व्याख्यानाचा शेवट केला. व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तरात त्यांनी उत्तरे देऊन उपस्थितांच्या शंका दूर केल्या.

देऊळगावकर यांनी पालघरमधील पाणेरी नदीचे प्रदूषण आणि त्यामुळे प्रभावित झालेली वडराई खाडी परिसर पाहून त्याची माहिती घेतली होती. वडराईतील नारळी, पोफळीची व माडांची झाडे आणि हिरव्यागार वाड्या तसेच समुद्रकिनारा पाहून देऊळगावकर प्रसन्न झाले. काही वर्षांनी हे सर्व वैभव समुद्र गिळंकृत करेल की काय अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ पदाधिकारी विद्याधर ठाकूर यांनी स्वागत केले. कविवर्य वसंत बापटांच्या प्रार्थनेनंतर निर्भय पाटील यांनी प्रस्तावना आणि देऊलगावकरांचा परिचय करून दिला.

First Published on: December 6, 2019 5:44 AM
Exit mobile version