वसईत करोनाचा पाचवा बळी

वसईत करोनाचा पाचवा बळी

वसईत करोनाच्या लागण झाल्याने एका 60 वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर दिवसभरात करोनाचे 15 रुग्ण आढळले असून त्यात एका चार दिवसाच्या बाळाचाही समावेश आहे. वसई विरार परिसरात 82 जणांना करोनाची बाधा झाली असून त्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सात जण करोनामुक्त झाले असून सध्या 70 रुग्ण उपचार घेत आहेत.
वसई पश्चिमेकडील भाबोळा येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. शनिवारी त्यांना करोनाची बाधा झाल्याचे निदान झाले. त्यामुळे वसई विरार परिसरातील करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाचवर पोहचली आहे.

महापालिकेच्या नायगाव जुचंद्र येथील माता बाल संगोपन केंद्रातील तीन नर्स, दोन वॉर्डबॉय, एक आया यांना करोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर या केंद्रात असलेल्या चार दिवसाच्या बाळाला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. बाळाच्या वडिलांनाही करोनाची लागण झाली आहे. सुदैवाने बाळाच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. केंद्रातील नर्स गोराई बोरीवली, नायगाव पूर्व आणि बापाणे येथील आहेत. करोनाबाधित आया जुचंद्र गावातील आहे. या घटनेनंतर माता बाल संगोपन केंद्र सिल करण्यात आले आहे.

विरार पश्चिमेकडील करोनाबाधित इसमाच्या 33 वर्षीय पत्नीला करोनाची बाधा झाली आहे, तर नालासोपारा पूर्वेकडील करोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या 47 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. नालासोपारा पूर्वेकडील 20 वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे. तसेच विरार पूर्वेकडील 41 वर्षीय महिलेला करोनाची बाधा झाली आहे, तर करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने विरार पूर्वेकडील 31 वर्षीय पुरुषाचा करोनाची लागण झाली. 14 एप्रिलला करोनाची लागण झालेल्या वसई पश्चिमेकडील इसमाच्या 30 वर्षीय पत्नीला करोनाची लागण झाल्याचे शनिवारी उजेडात आले.

First Published on: April 19, 2020 4:33 AM
Exit mobile version