सरकारी खाजण जमिनीवरील अवैध गोदामांच्या बांधकामावर कारवाईची मागणी

सरकारी खाजण जमिनीवरील अवैध गोदामांच्या बांधकामावर कारवाईची मागणी

सरकारी खाजण जमिनी

भिवंडी तालुक्यात गोडाऊन तसेच निवासी इमारतींच्या बांधकामांमुळे जमिनीला सोन्याचा भाव चढला आहे. त्यामुळे भूमाफियांनी महसूल, वनविभाग आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथील खाडीकिनाऱ्यावरील संरक्षित कांदळवन नष्ट करून माती भरावाने खार जमिनीचे सपाटीकरण करून सरकारी खाजण जमिनीवर वाणिज्य गोडाऊनचे अवैध बांधकाम सर्रासपणे सुरु केल्याचा प्रकार समोर आला आहे. मौजे दिवेअंजूर येथील सर्व्हे नं.१८० / अ पै., क्षेत्र. ४६ – ७२ – ० या सरकारी खार जमिनीवर विकासक रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी अतिक्रमण करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे मोठमोठे वाणिज्य गोदाम उभारले असून त्या ठिकाणी सर्रासपणे नव्याने बांधकाम सुरु आहे. या गोदामांवर ठाणे जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी निष्कासन कारवाई करून सरकारी खाजण जमीन मोकळी करावी, अशी मागणी समाजसेवक प्रदीप गंगाराम पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

भिवंडी तालुक्यातील मौजे अंजूरदिवे येथील जमिनी सर्व्हे नं .१८० / अ पै., क्षेत्र. ४६ – ७२ – ० या सरकारी खाजण जमिनीवर बिल्डर रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे व्यावसायिक गोदामांचे बांधकाम केलेले आहे, अशी तक्रार तहसील कार्यालयात प्राप्त झाली आहे. त्याची तपासणी करून लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– शशिकांत गायकवाड, तहसीलदार, भिवंडी

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कांदळवन जमिनीवर माती भराव करून अवैधपणे बांधण्यात येणाऱ्या गोडाऊनमुळे आजुबाजूच्या भातशेतीचे मोठे नुकसान होत असून तिवरांच्या झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरणाला देखील मोठा धोका निर्माण झाला आहे. या सरकारी जमिनीवरील अवैध गोदाम बांधकामांच्या विरोधात यापूर्वीही अनेकवेळा ग्रामस्थांनी तक्रारी दिलेल्या आहेत. मात्र त्याकडे महसूल, वन आणि एमएमआरडीए अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

First Published on: March 26, 2019 9:47 PM
Exit mobile version