महाडमधील घरे पुन्हा बोलकी होताहेत…बाजारपेठेत मात्र अजूनही चिखलाचे साम्राज्य

महाडमधील घरे पुन्हा बोलकी होताहेत…बाजारपेठेत मात्र अजूनही चिखलाचे साम्राज्य

गेली पंधरा दिवस संपूर्ण महाड शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. हा चिखल काढण्याचे काम आज देखील सुरूच आहे. दुकानांची साफसफाई करत जवळ असलेला माल पुन्हा लावण्याच्या तयारीत महाडचे व्यापारी आहेत. शहरातील मुख्य मार्गावर आता भाजी, फळे आणि दूध विक्रेत्यांनी आपली दुकाने सुरू केली आहेत. महाडची कोलमडलेली बाजारपेठ आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे.

यापूर्वी महाड शहरात येणार्‍या पुराच्या पाण्याने सुकट गल्लीपासून मुख्य बाजारपेठेतील दुकानांना फटका बसत आला आहे. सन २००५ मध्ये देखील बाजारपेठ, नवीपेठ, नावेनगर, आणि छ.शिवाजी चौक यादरम्यान असलेल्या दुकानांचे नुकसान झाले होते. यावेळी मात्र पुराच्या पाण्याने संपूर्ण महाड शहराला गिळंकृत केले. यामुळे शेकडो मोठे व्यापारी आणि हजारो लघु व्यावसायिकांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर डोळ्यादेखत नष्ट झालेले दुकान आणि घराकडे पाहत महाडकर नागरिकांनी दुकान आणि घराची स्वच्छता काही तासातच सुरू केली. प्रशासकीय सेवा येण्याच्या आतच दुकानदारांनी आणि लोकांनी घरातील भिजलेले सामान रस्त्यावर आणून टाकले. आज तेरा दिवसांनंतर महाड पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.

पुराच्या पाण्याचा फटका सहन करणार्‍या महाडकर नागरिकांनी या पुराचा देखील सामना करत आपले घर सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आजदेखील अनेक घरांची साफसफाई सुरू असली तरी सामाजिक संस्थांच्या बळावर घरे पुन्हा बोलकी होत आहेत. महाड शहरातील मुख्य बाजारपेठेत आज चिखलाचे साम्राज्य असले तरी दुकानदारांनी आपल्या दुकानातील माल सेल स्वरूपात लावल्याने बाजारपेठ तेरा दिवसांनी बोलकी झाली आहे. बाजारपेठेत ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली असून खरेदीला महिलांनी कपड्यांच्या दुकानांवर गर्दी केली आहे. काही प्रमाणात बाजारात भाजी येत असल्याने हातगाडी व्यावसायिकांनी देखील हातगाडी लावून भाजी विक्री सुरू केली आहे. शहरातील टपरी धारकांनी देखील आपली टपरी पुन्हा सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. काही प्रमाणात चहाची दुकाने देखील सुरू करण्यात आली आहेत. मासळी विक्रेते महाड शहराच्या बाहेर महामार्गावर येऊ लागले आहेत.

First Published on: August 7, 2021 4:15 AM
Exit mobile version