परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड देणारी उद्योगिनी

परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड देणारी उद्योगिनी

भारतीय समाजव्यवस्था ही व्यवसायानुसार विभागली होती. आधुनिकीकरण झाल्यानंतर परंपरागत व्यवसाय आणि पिढ्यानपिढ्या जपलेले कौशल्य लुप्त व्हायला लागले. चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय आज जगभरात नावारुपाला आला आहे. मात्र एकेकाळी या व्यवसायाचे सूत्र हातात ठेवणारा चर्मकार समाज आज यातून बाहेर फेकला गेला आहे. चामड्याच्या वस्तूंना उपलब्ध झालेला पर्याय, परदेशी उत्पादनांची चलती आणि बदललेली बाजारपेठ याला कारणीभूत आहे. चर्मकार समाजातील नवीन पिढी मात्र आता या आव्हानांचा सामना करत आहे. पद्मजा राजगुरु या उच्चशिक्षित असलेल्या उद्योजिका सध्या लेदर इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पद्मजा यांनी आयटीमधील नोकरी सोडून आपल्या पिढीजात व्यवसायाला चालना देण्याचे काम सुरू केले आहे. अवघ्या १० हजारांचे भांडवल वापरुन सुरु केलेला ‘द ऑरा’ या ब्रँडच्या माध्यमातून पद्मजा आज लाखोंचा लेदर व्यवसाय करत आहेत.

“आयटी क्षेत्रात काम करुनही समाधान मिळत नव्हते. नवीन काहीतरी करण्याची इच्छा असतानाच एकदा कॅप्टन अमोल यादव यांचे व्याख्यान ऐकले. देशी बनावटीचे विमान तयार करण्याची यादव यांची कहानी पद्माजा यांना प्रेरणा देऊन गेली. या प्रेरणेतूनच त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ व्यवसाय करण्याचे ठरविले. मात्र कोणताही व्यवसाय करायचा असल्यास त्याचे तंत्र अवगत करणे गरजेचे असते. त्यामुळेच त्यांनी मुंबई फॅशन अ‍ॅकडमीमधून बॅग आणि शू डिझायनिंग कोर्स पूर्ण केला. त्यानंतर औरंगाबाद येथून उद्योजक विकासाचे प्रशिक्षण घेतले. व्यवसाय करण्याआधी दोन वर्ष बाजारपेठेचा अभ्यास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामधून एक्झिबीटर म्हणून काम केले. पुरेसे भांडवल आणि अनुभव गोळा केल्यानंतर २०१९ मध्ये पद्मजाने लेदरच्या वस्तू बनवायला सुरुवात केली. धारावी येथे या वस्तूंचे उत्पादन करुन त्याची विक्री केली जात आहे.

पद्मजा राजगुरू

पद्मजा सांगतात की, आयटीमधील नोकरी सोडून जेव्हा पिढीजात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबाने साथ दिली, म्हणून हे शक्य झाले. मात्र हा निर्णय वाटतो तितका सोप्पा नव्हता. एका मुलाची जबाबदारी सांभाळून हे सर्व करायचे होते. चर्मकार समाजासाठी असलेल्या लिडकॉम (संत रोहिदास महामंडळ) या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संघर्षाच्या काळात मोलाची साथ दिली. महिला उद्योजिका म्हणून पाय रोवण्यासाठी लिडकॉमच्या ढाबरे यांनी मदत केली. तसेच उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदिप कांबळे यांनी मार्गदर्शन आणि प्रेरणा दिल्यामुळेच माझा पुढचा प्रवास सोपा झाल्याचे पद्मजा सांगतात. आपले बालपणातील शिक्षण परभणीसारख्या दुष्काळी भागात काढलेल्या आणि रस्सीखेच खेळातील राष्ट्रीय खेळाडू असलेल्या पद्मजा यांच्याकडे मुळातच संघर्ष करण्याच वृत्ती होती. या वृत्तीला त्यांनी अभ्यासाची जोड देत लेदर इंडस्ट्रीमध्ये आपले पाय रोवले आहेत.

पद्मजा सांगतात की, भारतात कौशल्यप्रधान मजूरांना फार सन्मान नाही. त्यात चर्मकार समाज या व्यवसायातून बाहेर पडत चाललाय. व्यवसाय वृद्धिंगत करत असतानाच कौशल्य असलेल्या कामगारांना सन्मान मिळवून देणे आणि नव्या पिढीला व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करण्याचे काम येणार्‍या काळात करणार असल्याचे पद्मजा सांगतात. पद्मजा यांनी लेदर उत्पादनात कल्पकता दाखविल्यामुळे त्यांना ‘महा बिझनेस अवॉर्ड २०१९’ने गौरविण्यात आले आहे. लेदर इंटस्ट्रिज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र या संस्थेने उभरती महिला उद्योजिका म्हणून २०१८ साली गौरविले होते. मावळते सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी उभरती महिला उद्योजिका म्हणून सन्मान दिलेला आहे.

पद्मजा राजगुरू

 

First Published on: October 4, 2019 1:13 AM
Exit mobile version