अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी – मधुबाला !

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी – मधुबाला !

अताऊल्ला खान यांचे पूर्वज अफगाणिस्तानातून भारतात आले आणि इकडचेच होऊन गेले. काबूलच्या एका नवाब घराण्याशी संबंधित असलेल्या अताऊल्ला खान आणि त्यांच्या पत्नी आयेशा बेगम यांना एकूण अकरा मुले होती. त्यातील पाचवी मुलगी म्हणजे मुमताज जहाँ बेगमचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ मध्ये दिल्लीत झाला होता. अताऊल्ला खान यांचे कुटुंब मोठे असल्यामुळे आमदनी अठन्नी और खर्चा रुपया अशी परिस्थिती होती. बराच काळ त्यांच्या हाताशी कुठलेच काम आले नाही. शेवटी कुणीतरी सुचवलेला एक पर्याय म्हणून लहान मुमताजला घेऊन ते वेगवेगळ्या स्टुडिओच्या पायऱ्या झिजवू लागले. मुमताजला कुणीतरी बालकलाकार म्हणून आपल्या चित्रपटात घेईल, जेणेकरून कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल अशी त्यांना आशा होती.

१९४२ मध्ये मुमताजला एक बालकलाकार म्हणून ‘बसंत’ नावाचा पहिला चित्रपट मिळाला. यानंतर बेबी मुमताज या नावाने तिने अनेक चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले. अशाप्रकारे घरातल्या जबाबदाऱ्या अगदी लहान वयातच तिने स्वतःच्या खांद्यावर पेलवल्या. मात्र या नादात आपलं शिक्षण अपुरे राहिले याची खंत तिला आयुष्यभर होती.

बेबी मुमताज मोठी झाली आणि बालकलाकाराच्या फेऱ्यातून सुटून १९४७ साली प्रदर्शित झालेल्या लेखक-निर्माता-दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या ‘नीलकमल’ या चित्रपटातून ती लीड रोलमध्ये झळकली. शोमॅन राज कपूर या चित्रपटाद्वारे तिचा पहिला नायक ठरला. काळ बदलला, भूमिका बदलल्या तसेच बेबी मुमताजचे नावही बदलले. त्यावेळची नामांकित अभिनेत्री देविकाराणीने मुमताज जहाँ बेगमला ‘मधुबाला’ असे नाव दिले. या चित्रपटानंतर मधुबालाला अनेक चित्रपट मिळाले. १९४९ साली दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या ‘महल’ या सुपरहिट चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाचे नायक आणि निर्माते अशोक कुमार होते. १९५१मध्ये निर्माता-दिग्दर्शक डी. डी. कश्यप यांच्या ‘आराम’ या चित्रपटात मधुबाला, देव आनंदची नायिका बनली. मधुबालाला त्या काळातील जवळजवळ सर्वच नामांकित सुपरस्टार्ससोबत काम करण्याचे भाग्य लाभले. असे असले तरीही मधुबालाला मात्र दिलीप कुमारसोबत सर्वात जास्त चित्रपट करायला मिळाल्याचा आनंद होता. त्याबद्दल ती म्हणायचीही की, दिलीप साहेबांची सर्वात मोठी खुबी आणि खासियत ही होती की, ते जेव्हाही एखाद्या चित्रपटातील शूटिंगमध्ये माझ्यासोबत रोमँटिक सीन करायचे, तेव्हा ते माझ्यासोबत एक्टिंग करताहेत असं अजिबात वाटायचं नाही. त्यांच्या नजरेतून माझ्यासाठी वाहणार प्रेमच मला दिसायचं आणि त्यांच्या हृदयाचे ठोके मला, ते माझ्यावर फिल्मी नव्हे, तर खरं प्रेम करताहेत या गोष्टीची जाणीव करून द्यायचे !

मधुबालाची धाकटी बहीण मधुर भूषणच्या म्हणण्यानुसार, दिलीप साहेब आणि मधुबालाचे प्रेमसंबंध तब्बल आठ वर्षे चालले. मात्र ‘नया दौ चित्रपटा दरम्यान त्यावर ठिणगी पडली. मधुबाला दिलीप कुमारवर नाराज झाली. घडले असे कि, नया दौर या बी. आर. चोप्रा यांच्या चित्रपटामध्ये मधुबाला आणि दिलीप कुमार एकत्र काम करत होते. परंतू काही सीन्सच्या लोकेशन मधुबालाच्या वडिलांना असुरक्षित वाटले. त्यांनी चोप्रांकडे लोकेशन्स बदलावेत अशी मागणी केली. परंतू चोप्रा त्यासाठी तयार नव्हते. अखेर ही छोटीशी गोष्ट कोर्टापर्यंत गेली. त्यावेळी दिलीप कुमारनी मधुबालाच्या बाजूने कोर्टामध्ये बोलावे अशी त्यांची अपेक्षा होती. पण दिलीप कुमारने कोर्टात चोप्रांची बाजू घेतली आणि मधुबालाच्या वडील नाराज झाले. ही घटना उलटून गेल्यावर काही काळाने दिलीप कुमार मधुबालाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते. त्यावेळी घडल्या घटनेवरून माझे वडील नाराज आहेत. तू फक्त त्यांना एकदा सॉरी म्हण. ते राग-रुसवा नक्की सोडून देतील एवढीच माफक अपेक्षा मधुबालाने दिलीप साहेबांना बोलून दाखवली होती. मात्र दिलीप कुमारने ती अमान्य केली आणि दोघेही नेहमीसाठी दुरावले.

मधुबालाने यावर खंतही व्यक्त केली आहे. ती म्हणाली होती. “खूप नशीबवान असतात त्या मुली ज्यांच्या आवडीला, त्यांच्या आई-वडिलांची पण पसंती असते. पण माझं नशीब एवढं चांगलं नव्हतं. कारण एका बाजूला होते माझे अब्बा आणि दुसऱ्या टोकाला होतं माझं प्रेम, दिलीप साहब… दोघांच्याही अहंकाराने आम्हाला भेटू दिलं नाही.

मधुबाला दिलीप कुमारबद्दल म्हणते की, “ तो ट्रॅजेडी किंग आहे यावर माझा विश्वासच नव्हता. पण हळूहळू माझा त्यावर विश्वास बसू लागला. कारण जोपर्यंत तो माझ्या आयुष्यामध्ये होता तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये ट्रॅजेडीशिवाय काहीच घडलं नाही. मग माझ्या जीवनात कॉमेडी किंग आला- किशोर कुमार !… ज्याच्या सोबत मी अनेक चित्रपट केले.“ मधुबाला प्रेमात पडण्यासारखीच होती. त्यामुळे साहजिकच किशोर कुमार तिच्या प्रेमात पडला. असे म्हटले जाते की, दिलीप कुमारच्या धक्क्यातून सावरण्यासाठी मधुबालाने किशोर कुमार सोबत जिद्दीने लग्न केले.

नियतीचा क्रूर खेळ इथेच संपला नाही. एक दिवस शूटिंगच्या दरम्यान मधुबालाची अचानक तब्येत बिघडली. खोकल्याची उबळ अशी आली की, रक्ताची उलटी झाली. तेंव्हा कळले की, मधुबालाला अगदी लहानपणापासूनच हृदयाशी संबंधित आजार आहे. मधुबालाचा आजार बळावला त्यासाठी किशोर कुमार तिला परदेशी घेऊन गेले. डॉक्टरांनी ती फक्त दोन वर्षे जगेल असे सांगितले तेव्हा किशोर कुमारच्या पायाखालची जमीन सरकली. परंतु चेहऱ्यावरचे हास्य ढळू न देता किशोर कुमार तसेच बाहेर आले आणि मधुबालाला, तू बरी होशील असा दिलासा देऊन, भारतात घेऊन परतले. ठरल्याप्रमाणे चित्रपटसृष्टीला पडलेले मधुबाला हे सुंदर स्वप्न २३ फेब्रुवारी १९६९ ला काळाने हिरावून घेतले. त्यावेळी मधुबाला अवघ्या ३६ वर्षांची होती.

First Published on: February 14, 2023 8:53 AM
Exit mobile version