भाईंदरमध्ये शेतीचे पंचनामे सुरू

भाईंदरमध्ये शेतीचे पंचनामे सुरू

मीरा भाईंदरमधील शेतींचे पंचनामे करण्याचे काम तलाठ्यांनी सुुरु केल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे

परतीच्या पावसामुळे मीरा भाईंदरमधील शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून तलाठ्यांनी शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. भाईंदरच्या मुर्धा, राई, मोरवा, डोंगरी, तारोडी, उत्तन, पाली तर काशिमीरा येथील चेणे, काजूपाडा, घोडबंदर, वरसावे, काशी आदी भागातील शेतकर्‍यांच्या भात पिकांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेलें पीक पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. काहींनी तर कापणी करून ठेवले भात पीक पावसामुळे कुजून गेले. भाजीपाला पावसाने नासून गेला.

शासनाकडून नुकसान भरपाईसाठी शेतीचे पंचनामे झाले नसल्याचे उघड केले होते. त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देऊन शेतकरी आणि मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्याची व तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली होती.

तलाठ्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असल्याचे अप्पर तहसीलदार देशमुख यांनी सांगितले. राई, मुर्धा, मोरवा भागात तलाठी अनिता पाडवी यांनी, उत्तन – डोंगरी भागात तलाठी उत्तम शेडगे तर चेणे काशी भागात तलाठी अभिजित बोडके यांनी शेतकर्‍यांना भेटून पिकांची पाहणी करत पंचनामे करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. महसूल विभागाने नाहक तांत्रिक त्रुटी काढू नयेत, नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी उत्तन येथील पंचनाम्या करणार्‍या अधिकार्‍यांना सांगितले.

 

First Published on: November 8, 2019 5:25 AM
Exit mobile version