चॅनेलचा कमाल दर १२ रूपयांनी घटणार

चॅनेलचा कमाल दर १२ रूपयांनी घटणार

दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) मार्फत दूरचित्र वाहिन्यांसाठी (चॅनेल्स) किमतीची कमाल मर्यादा १९ रूपयांपासून १२ रूपये प्रति महिना अशी कमी करण्यात येणार आहे. येत्या १ मार्चपासून हे बदल अंमलात येतील. त्यामुळे डीटीएच कंपन्यांना एक मोठा झटका बसतानाच ग्राहकांसाठी मात्र हा मोठा दिलासा असेल. डीटीएच कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढावी यासाठीच नॅशनल टॅरिफ ऑर्डर (एनटीओ) अंतर्गत हे बदल करत असल्याचे स्पष्टीकरण ट्रायमार्फत देण्यात आले आहे.

ट्रायने जाहीर केलेल्या एनटीओनुसार आता ग्राहकांना किमान किंमत १२ रूपये मोजावी लागणार आहे. ग्राहकांना सेवा पुरविताना डीटीएच ऑपरेटर्सनाही १२ रूपयांपेक्षा जास्त किंमत आकारता येणार नाही. चॅनेल पॅक निवडण्यापेक्षा निवडक वाहिन्यांकडे ग्राहकांचा कल असावा यासाठी ट्राय आग्रही आहे. पण ट्रायकडून सातत्याने होणारे बदल पाहता ग्राहकांसमोरही हे बदल लक्षात ठेवणे हे आव्हान असणार आहे. ट्रायमार्फतची एनटीओची सवलत ही सरासरी १४ टक्के इतकी कमी असेल, असे एनटीओच्या सुधारणांच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

याआधी ट्रायचे अध्यक्ष राम सेवक शर्मा यांनी पाच मुख्य ब्रॉडकास्टर्सने २०० टक्के दर वाढवल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळेच नवीन एनजीओची दुरूस्ती आणावी लागली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. नवीन सुधारणा या ग्राहक हिताच्या असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नवीन सुधारीत नियमावलीनुसार ब्रॉडकास्टर्समार्फत वाहिन्यांचे दर कमी होतील, असे अपेक्षित आहे. पण दर कमी नाही झाले तर योग्य ती कारवाई करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: January 26, 2020 5:36 AM
Exit mobile version