एकतर्फी प्रेमातून सिद्धिविनायकाचे मंदिरच उडवायला निघाला की…

एकतर्फी प्रेमातून सिद्धिविनायकाचे मंदिरच उडवायला निघाला की…

सिद्धिविनायक मंदिर

ठाणे येथील विवियाना मॉलवरील बाथरूममधील जाहिरातीखाली ‘गझवा ए हिंद, दादर सिद्धिविनायक मंदिर बूम, इसिस इज कमिंग, स्लीपर सेल इज ॲक्टीवेटेड ?’ असा संदेश लिहिल्यामुळे मॉलमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावला. मात्र हा प्रकार एका प्रेमवीराने आपल्या केल्याचे तपासात पुढे आले आहे. ठाणे पोलिसांनी अवघ्या चार तासांत हा संदेश लिहिणाऱ्याच्या मुसक्या बांधल्या आहेत.

विवियाना मॉलच्या पहिल्या मजल्यावरील जेन्टस्‌ बाथरूमध्ये दहशत पसरविणारा संदेश लिहिल्यानंतर त्या खाली एका मुलीचा व दुसऱ्या संदेशामध्ये तिच्या मित्राचा मोबाईल क्रमांक लिहिला होता. या दोघांनाही पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर ज्यांचा फोन क्रमांक लिहिला आहे ते तरुणतरुणी एकाच कंपनीत काम करत असल्याचे आढळले. त्या तरुणीकडे विचारपूस केल्यानंतर तिने तिच्या जुन्या मित्राबद्दल संशय व्यक्त केला.

विक्रोळी येथील केतन घोडके याच्यासोबत सदर तरुणीची ७ वर्षांपासूनची मैत्री होती. मात्र मागील काही दिवसांपासून तरुणीने हे प्रेम संबंध तोडल्याने तिला व तिच्या मित्राला त्रास देण्याच्या दृष्टीने केतन घोडके यांने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी संदेश लिहिणाऱ्या तरुणाला अवघ्या ४ तासांत ताब्यात घेऊन त्याला प्रतिबंधात्मक अटक केली आहे. हे दहशतवादी कृत्य नसून खोडसाळपणे केलेले कृत्य असल्याचे पोलिसांनी सांगितले असून संबंधित तरुणावर वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याची अधिक चौकशी सुरू आहे.

 

First Published on: June 17, 2019 1:08 PM
Exit mobile version