राफेल प्रतिज्ञापत्रातील दोषामुळे मोदी सरकार बॅकफूटवर

राफेल प्रतिज्ञापत्रातील दोषामुळे मोदी सरकार बॅकफूटवर

राफेल विमान ( फोटो सौजन्य - The Morung Express )

राफेलप्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अक्षम्य चुका आढळून आल्यामुळे केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. नजरचुकीने झालेला दोष, असे सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात क्षमायाचना करायला सुरुवात केली आहे. यामुळे देशभरात भाजपच्या होत असलेल्या बदनामीतून सुटका व्हावी, म्हणून आता पत्रकार परिषदांचा धडका सुरू करण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या राफेल विमान खरेदीतील करारावर विरोधकांकडून जोरदार आक्षेप घेण्यात येत आहेत. माजी मंत्री अरुण शौरी आणि यशवंत सिन्हा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकालात काढताना सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे राफेल करारात काही गैर नसल्याचे अनुमान सर्वोच्च न्यायालयाने काढले होते. विशेष म्हणजे ज्या कागदपत्रांच्या आधारे हे निष्कर्ष काढण्यात आले. त्यातील सरकारचे प्रतिज्ञापत्रात अक्षम्य चुका असल्याची बाब पुढे आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सादर झालेल्या प्रतिज्ञापत्रात संयुक्त संसदीय समिती आणि कॅगच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला होता.

हा संदर्भ पूर्णत: चुकीचा असल्याचा आक्षेप याचिकाकर्ते शौरी आणि सिन्हा यांनी घेतला आहे. विरोधी पक्षांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. हे प्रकरण कॅगकडे गेले नाहीच आणि संयुक्त संसदीय समितीपुढीही हे प्रकरण गेले नसल्याचे नमूद केले. जेपीसीचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनीही यावर जोरदार आक्षेप घेतला. असे असताना केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख कोणी केला, अशी विचारणा विरोधकांकडून सुरू झाली आहे. याचा खुलासा करताना ‘नजरचुकीने झालेला दोष’ असे सांगण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. यामुळे केंद्रातले भाजप सरकार बॅकफुटवर आले असून, जनमानसात यामुळे सरकारची छबी चांगलीच काळवंडली असल्याचे भाजपच्या लक्षात आले आहे. यावर उपाय म्हणून देशभरात ७० पत्रकार परिषदा घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. याची सुरुवात काल मुंबईपासून झाली.

आरोप कपोलकल्पित
राफेलप्रकरणात भ्रष्टाचार झाला हा काँग्रेसचा आरोप कपोलकल्पित असल्याचा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. काँग्रेसकडे मुद्दे नसल्याने राफेलसारखे विषय काँग्रेस पक्ष पुढे करत आहे. विनाशस्त्र विमानाच्या बेसिक किंमत आणि पूर्णपणे शस्त्रसज्ज लढाऊ विमानांची किंमत योग्यच असल्याचा दावा संरक्षणमंत्र्यांनी केला. काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी भाजपने महिला केंद्रीय शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांना कलकत्ता इथे, पूनम महाजन यांना पुणे तर सीतारामन यांना मुंबईत पाठवण्यात आले होते. काँग्रेसच्या काळात संरक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सीतारामन यांनी काँग्रेसला होत असलेल्या त्रासामुळे राफेलमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तो पक्ष करत आहे, असे म्हटले.

First Published on: December 18, 2018 5:22 AM
Exit mobile version