२४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून अहवाल २४ तासांच्या आत द्यावा – आयुक्त

२४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून अहवाल २४ तासांच्या आत द्यावा – आयुक्त

मुंबई महानगरपालिका

‘कोरोना कोविड १९’ची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या विविध खाजगी प्रयोगशाळांनी व्यक्तींचे नमूने घेतल्यापासून २४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करुन त्याविषयीचे अहवाल आणि माहिती ‘आयसीएमआर’ संबंधित संकेतस्थळावर २४ तासांच्या आत अपलोड करून त्याची प्रत महापालिकेकडेही पाठवावी, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील सर्व खाजगी प्रयोगशाळांना दिले आहेत.

काय दिले निर्देश?

मुंबईतील खाजगी प्रयोग शाळांच्या प्रतिनिधींची एक विशेष बैठक शुक्रवारी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्यासह महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील ज्येष्ठ अधिकारी आणि इतर खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी, केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार संशयित आणि लक्षणे असलेल्या व्यक्तींचे नमुने घेतल्यापासून २४ तासांच्या आत वैद्यकीय तपासणी करून संबंधित अहवाल देखील २४ तासांच्या आतच संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावयाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत अहवाल अपलोड करण्यास विलंब होणार नाही, याकडे अत्यंत काटेकोरपणे प्रयोगशाळांनी लक्ष द्यावे, असे निर्देश दिले.

‘होम क्वारंटाईन’ असलेल्या व्यक्तींची तपासणी १४ दिवसांच्या आत करावी

मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील खाजगी प्रयोग शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवावे. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार खाजगी प्रयोगशाळांद्वारे योग्य प्रकारे कामकाज होत असल्याची आणि ‘कोरोना कोविड १९’विषयक वैद्यकीय अहवाल ‘आयसीएमआर’ च्या संकेतस्थळावर निर्धारित वेळेतच अपलोड होत असल्याची खातरजमा नियमितपणे करवून घ्यावी, अशाही सूचना महापालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांना महापालिका आयुक्तांनी केल्या.

त्याचबरोबर ज्या व्यक्ती परदेशातून आल्या आहेत किंवा ज्या व्यक्तींचे घरच्याघरी विलगीकरण करण्यात आले आहे, अशा व्यक्तींचे नमुने घेणे आणि वैद्यकीय चाचणी करणे. याबाबतची आवश्यक ती प्रक्रिया १४ दिवसांच्या आत करणे बंधनकारक केले आहे.


हेही वाचा – मुंबईत कोरोनाचा जीवघेणा थरार सत्ताधारी फरार – आशिष शेलार


 

First Published on: May 22, 2020 10:33 PM
Exit mobile version