खासगी रुग्णालयाचे अतिदक्षता कक्ष आता महापालिका वापरणार

खासगी रुग्णालयाचे अतिदक्षता कक्ष आता महापालिका वापरणार

खाजगी रुग्णालयांनी आपले अतिदक्षता कक्ष महानगरपालिकेस वापरण्यास मुभा दिली असून यामुळे येथील खाटा मोठ्या संख्येने वापरण्यास मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. तसेच यापूर्वी मुंबईकरांनी लॉकडाऊनच्या काळात ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढे केल्यास कोरोनावर निश्चित मात करू, असा विश्‍वास व्यक्त करत दुसर्‍या जिल्ह्यातील डॉक्टर मोठ्या संख्येने मुंबईत येत आहे. त्यामुळे डॉक्टरांची कोणतीही कमतरता नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी रविवारी शीव रुग्णालयातील कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असलेल्या कक्षात जाऊन रुग्ण तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची वैयक्तिकरित्या विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनीही माहिती दिली. कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता कोरोना रुग्ण व त्यांच्यावर उपचार करणारे रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविणे आवश्यक असून त्यासाठीच सर्व रुग्णालयांना आवर्जून भेटी देत असल्याचे प्रतिपादन चहल यांनी केले. कोरोनावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांनी सिंहाचा वाटा उचलला असून शीव रुग्णालयातील रुग्ण तसेच रुग्णालयाची स्थिती कशी आहे? याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी याठिकाणी आलो असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्ण तसेच परिचारिका व पॅरामेडिकल स्टाफ यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांच्या काय सूचना आहे, आरोग्य सुविधांमध्ये काय सुधारणा करणे शक्य आहे? हे त्यांच्याकडून जाणून घेता आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अतिदक्षता विभागामध्ये (आयसीयू युनिट) कॅमेरे लावून याठिकाणी कंट्रोल रूममधून नियंत्रण करणे शक्य आहे का? याची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णालयातील शवागारात जाऊन निर्धारित केलेल्या प्रणाली प्रमाणे काम होत आहे की नाही? याची पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले.

बैगनवाडी परिसराला भेट

महापालिका आयुक्तांनी एम/पूर्व विभागातील बैगनवाडी भागाला भेट दिली. महापालिका आयुक्तांनी येथील नागरिकांशी व डॉक्टरांशी चर्चा केली. खाजगी डॉक्टरांना पीपीई किट महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार असून आपण येथील रुग्णांची आरोग्य तपासणी नियमित करावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. नागरिकांनी अन्नपुरवठाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तात्काळ या भागात दहा हजार अन्न पाकिटे उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधितांना दिले. यावेळी सहाय्यक आयुक्त सुधांशु दिवेद्वी उपस्थित होते.

शीव रुग्णालयात एकूण चौदाशे पन्नास खाटा उपलब्ध असून यापैकी ३८० खाटा या कोविड बाधितांसाठी असल्याचे सांगितले. मागील दोन महिन्यात १५० महिलांची प्रसूती सुखरूपपणे पार पडल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल सांगितले. सद्यस्थितीत रूग्णालयात २८३ कोरोनाबाधित रुग्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी, महापालिका आयुक्तांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश  काकाणी, राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

एमएमआरडीएवरील रुग्णालय मंगळवारपासून सुरु

नीती आयोगाने मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४.५ दिवसावर आला असल्याची माहिती आजच दिल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. केंद्रशासनाच्या दिशा निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काम सुरू असून त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे, सात दिवसानंतर रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. यामुळे अधिक खाटा उपलब्ध होण्यात हातभार लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान येत्या मंगळवारपासून रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

First Published on: May 18, 2020 7:09 PM
Exit mobile version