खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड ताब्यात द्या

खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड ताब्यात द्या

कोरोना साथीच्या काळात कोविड आणि नॉन कोविड उपचार वाजवी दरात मिळणेकरिता पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार आता कोविड अथवा नॉन कोविड नोंदणीकृत खासगी रूग्णालयातील पीआयसीयु, एनआयसीयु, डे-केअर, हिमोडायलिसिस रूग्ण बेड वगळता उर्वरित बेड संख्येच्या 80 टक्के बेड महापालिकेच्या नियंत्रणाखाली आणण्यात आलेले आहेत. एखाद्या रूग्णाने अशा 80 टक्केे नियंत्रणाखाली बेडवर उपचाराची मागणी केल्यास व बेड उपलब्ध असल्यास रूग्णास त्यावर उपचार देणे, त्या रूग्णालयाला अनिवार्य राहील.

तसेच संबंधित रूग्णावर उपचारापोटी शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी करता येणार नाही, उर्वरित 20 टक्केे बेडवर उपचार घेणार्‍या रूग्णांकडून रूग्णालयाने निश्चित केलेल्या दरानुसार देयक आकारणी करण्यास मुभा राहील, परंतु त्या रूग्णालयातील 80 टक्के व 20 टक्केे बेडवर उपचार घेणार्‍या रूग्णाच्या उपचारात कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. रूग्णालयाने 80 टक्के व 20 टक्केे बेड्स किती, त्यापैकी रिक्त किती व भरलेले किती, त्याचप्रमाणे शासनाचे निर्धारित दर व रूग्णालयाचे दर, रूग्णालयाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावयाचे आहेत. त्याचप्रमाणे रूग्णालयात येणार्‍या रूग्णाला व त्याचे नातेवाईकांना दराबाबत व 80 टक्केे नियंत्रणाखालील रिक्त बेडबाबत सविस्तर माहिती द्यायची आहे.

रूग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील जे कर्मचारी कोविड 19 रूग्णांवर उपचार करण्यास नकार देतील व आपले कर्तव्य बजावण्यास कसूर करतील, असे कर्मचारी ‘मेस्मा’ कायद्यांतर्गत कारवाईस पात्र राहतील त्याचप्रमाणे रूग्णांकडून अवाजवी दर आकारले जात असल्याबाबत तक्रारी पात्र झाल्यास अथवा शासनाच्या नोटिफिकेशनमधील निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र नर्सिंग होम (दुरूस्ती) कायद्यान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच महापालिकेने दिलेली नोंदणी रद्द करण्यात येईल,असेही या आदेशात नमूद केलेले आहे. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अवाजवी दर लावल्याबाबत यापूर्वीच महापालिकेने दोन रुग्णालयांना नोटीस बजावलेली आहे.

रुग्णालयातील अवाजवी दराबाबत वा बेड उपलब्धतेबाबत तक्रार असल्यास महापालिका मुख्यालयातील वॉररुममधील 0251-2211866 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

First Published on: July 14, 2020 6:39 AM
Exit mobile version