समृद्धीच्या वादावर नामांतरणाचा उतारा!!

समृद्धीच्या वादावर नामांतरणाचा उतारा!!

समृद्धी महामार्ग

राजकारण ! म्हणजे सारा सारीपटाचा खेळ. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरू आहे. मात्र समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे नाव देऊन,भाजपकडून युतीचा महामार्ग जोडला जात असल्याची खेळी खेळली जात आहे. समृध्दीला बाळासाहेबांचे नाव दिल्यास शिवसेनेचा विरोध मावळू शकतो. त्यामुळे युतीसाठी समृद्धी महामार्गाच्या नामकरणाचे प्यादे वापरण्याची शक्यता आहे.

मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट!! समृद्धी महामार्गात अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी बाधित होत असल्याने या महामार्गाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शविला होता. महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तर, भाजपकडून माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहेत. शिवसेना भाजपची युती व्हावी अशी भाजपच्या काही पदाधिकार्‍यांची इच्छा आहे. त्यामुळे समृध्दी मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊन शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे.

समृध्दी महामार्गामुळे मुंबई – नागपूर हे अंतर ७१० किमीवर येणार आहे. सहा तासांत हे अंतर कापणे शक्य होणार आहे. ५६ हजार कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. तब्बल १२० मीटर रूंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या पाच महसूल विभागातील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्यांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांतून जाणार आहे.

समृध्दी महामार्गाला कुणाचे नाव द्यायचे हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय होणार आहे. मात्र याचा युतीवर कोणताही परिणाम होणार नाही.
– संजय केळकर, आमदार, भाजप

समृध्दी महामार्गाला शिवसेनेचा विरोध नाही. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामार्ग होत आहे. समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची मागणी शिवसेनेची आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय होईल. यावर मी काही बोलणे उचित ठरणार नाही.
– नरेश म्हस्के, ठाणे जिल्हाप्रमुख, शिवसेना

First Published on: January 17, 2019 5:18 AM
Exit mobile version