ईशान्य मुंबईचा वाद आता सोशल मीडियावरही रंगला; कार्यकर्ते आमने-आमने

ईशान्य मुंबईचा वाद आता सोशल मीडियावरही रंगला; कार्यकर्ते आमने-आमने

किरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे

ईशान्य मुंबई मतदारसंघाचा वाद आता अधिकच चिघळत चालला असून, संपूर्ण मुंबईत सध्या याच मतदारसंघाचा वाद चर्चिला जात आहे. आता तर चक्क सोशल मीडियावर सुध्दा हा वाद रंगू लागला असून, सोशल मीडियावर भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर ठाकले आहेत. शिवसेनेचा किरीट सोमय्या यांना होणारा विरोध लक्षात घेत भाजपा कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते फेसबुकवर आमने-सामने आले असून, एकमेकांना लाखोली वाहताना पाहायला मिळत आहेत. जर किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली तर सोमय्या यांच्या विरोधात मत देऊ, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली.

किरीटचा स्पिरीट दाखवू

दरम्यान, भाजपा कार्यकर्त्यांनी देखील आम्ही देखील मुंबईमध्ये किरीटचा स्पिरीट दाखवून देऊ आणि मुंबईच्या इतर मतदारसंघात शिवसेने विरोधात काम करू असे सांगत चला मग आता अरविंद सावंत, राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात नोटा दाबून किरीटचा स्पिरीट दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया आता भाजपा कार्यकर्त्यांकडून येताना दिसत आहे. तर दुसरीकडे शिवसैनिक देखील सोशल मीडियावर भाजपाला जशास तसे उत्तर देताना दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ईशान्य मुंबईच्या कार्यकर्त्यांनी देखील एक बैठक घेतली असून, जर शिवसेना आडमुठेपणाने वागणार असेल तर आम्ही देखील त्यांना जशास तसे मुंबईतल्या इतर भागात उत्तर देऊ अशी भूमिका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दोन्ही पक्षाच्या प्रमुखांची डोकेदुखी वाढली

एकीकडे हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या प्रमुखांकडून प्रयत्न होत असताना स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी चांगलीच वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर हा वाद लवकरात लवकर मिटवण्याच्या इराद्यात आहेत.

First Published on: March 29, 2019 1:50 PM
Exit mobile version