CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेपार

CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेपार

एकीकडे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना राबविल्या जात असतानाच दुसरीकडे जिल्हयात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ५४३ वर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा- भाईंदर या ठिकाणी रूग्णांनी शंभरीपार केली आहे तर नवी मुंबई शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी घरातच बसू राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून केल्यानंतरही अनेक ठिकाणी आजही नागरिक नियम पाळत नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात ठाणे, कल्याण- डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई आणि मीरा -भाईंदर या सहा महापालिका आणि अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांचा समावेश येतो. राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच ठाणे जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्येत भर पडत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १७८ कोरोनाबाधित रूग्ण असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ रूग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत. केडीएमसी हद्दीत ११४ रूग्ण आहेत. त्यापैकी ३ जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण हे रूग्णालयातून बरे होऊन घरी परतले आहेत. नवी मुंबईत ९७ रूग्ण पॉझिटीव्ह असून ४ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर २६ रूग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत. मीरा भाईंदरमध्ये कोरोनाबाधित ११७  रूग्ण असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर १० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. भिवंडीत सहा रूग्ण आहेत. अंबरनाथमध्ये चार रूग्ण आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर बदलापूरमध्ये १६ रूग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीण परिसरातही १६ रूग्ण असून ३ जण हे रूग्णालयातून बरे होऊन घरी परतले आहेत.

देशात लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे मात्र अजूनही बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढत असून सोशल डिस्टन्सींगचे नियम नागरिकांकडून पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून येत आहे.

First Published on: April 24, 2020 7:10 PM
Exit mobile version