…तर भायखळा, मलबारहिल परिसरात वाढू शकते कोरोना रूग्णांची संख्या!

…तर भायखळा, मलबारहिल परिसरात वाढू शकते कोरोना रूग्णांची संख्या!

मलबार हिल

मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने एकाबाजुला चिंता वाढत असतानाच या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये अभाव दिसून येत असल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी ‘ई’ विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांची बदली आहे. भायखळा, चिंचपोकळी, माझगाव या ‘ई’ विभागातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून ते रोखण्यात अपयशी ठरल्याने ही बदली केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण आपापल्यापरीने लढा देत असताना अशाप्रकारे केलेली बदली सर्वच सहायक आयुक्तांचे मनोबल खचण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत याचा प्रभारी चार्ज ‘डि’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे सोपवल्यामुळे या विभागातील रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे.

मुंबईतील भायखळा,  माझगाव, चिंचपोकळी या महापालिकेच्या ‘ई’ विभाग परिसरामध्ये  ८ एप्रिलपर्यंत रुग्णांची संख्या ६४ वर पोहोचली आहे. मात्र, या विभागात झपाट्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने तसेच योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्तांनी या विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांची बदली. त्यांच्या जागी नव्याने सहायक आयुक्त म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. परंतु एका बाजुला जुन्या अधिकाऱ्याची बदली करून  नवख्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रकारावरून आयुक्तांना विरोध झाल्यामुळे अखेर आयुक्तांनी ‘डि’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे या विभागाचा प्रभारी भार सोपवला आहे. नवीन  नियुक्त झालेल्या सहायक आयुक्तांची ऑर्डर कायम ठेवत गायकवाड यांच्याकडे या विभागाचा प्रभारी भार सोपवला आहे.

विशेष म्हणजे ‘ई’ विभागापाठोपाठ सर्वाधिक रुग्ण हे ग्रँटरोड, मलबार हिल, वाळकेश्वर या डि विभागात आहे. ‘ई’  विभागात ६४ रुग्ण आहेत, तर ‘डि’ विभागात ४६ रुग्ण आहेत. त्यामुळे एका बाजुला व्हीआयपी विभाग असलेल्या ‘डि’ विभागात परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी सहायक आयुक्त प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्यांना ‘ई’ विभागाचाही भार सोपवून एकप्रकारे त्यांची जबाबदारी वाढवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे ‘ई’ विभागात अधिक लक्ष देताना त्यांचा डि विभागात लक्ष कमी होवून नियंत्रणात असलेल्या विभागात अधिक रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोनाचे एवढे संकट असताना आणि सर्व अधिकारी प्रशासनाने नेमून दिल्याप्रमाणे काम करत असताना सहायक आयुक्तांची बदली करणे चुकीचे आहे. त्यांच्या जागी नवख्या सहायक आयुक्तांची बदली केली. आम्ही सांगितल्यानंतर या विभागाची जबाबदारी ‘डि’ विभागाच्या सहायक आयुक्तांवर सोपवली जाते. त्यांची बदली केली जाते तर सक्षम अधिकारी का  दिला जात नाही असा सवाल त्यांनी केला आहे. जर ‘ई’ विभागाला हा न्याय आहे तर जिथे रुग्ण वाढतात तिथेही आयुक्त हाच न्याय लावणार का असाही सवाल त्यांनी केला.

आयुक्त, नक्की कुणाच्या इशाऱ्यावर काम करता असा सवाल करत एका बाजुला राज्याचे मुख्यमंत्री योग्यप्रकारे परिस्थिती हाताळत असताना आयुक्तांच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा वाढत्या धोक्याला खुद्द महापालिका आयुक्तच जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यामुळे याबाबत विधीमंडळात आवाज उठवून प्रशासनाला याचा जाब विचारला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

First Published on: April 9, 2020 9:26 PM
Exit mobile version