तर पालिकेचा क्रमांक पहिल्या दहातही येणार नाही

तर पालिकेचा क्रमांक पहिल्या दहातही येणार नाही

नवी मुंबई महानगरपालिका

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांक यावा, यासाठी मनपा आयुक्तांनी गेल्या अनेक दिवसांपासून तन मन धन अर्पण केल्याने अनेक प्रश्न मार्गी लागले तर शौचालयांचा कायापालटच करण्यात आला. करोडो रुपये खर्च करून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मनस्थितीत असलेल्या आयुक्तांच्या दिशाभूल करण्यात आलेल्या कामांचा कथित ‘उलगडा’ शहराचे महापौर जयवंत सुतार यांनी बुधवारी झालेल्या महासभेत केला. जर केंद्रीय टीम नेरूळ शिवाजी नगर परिसरात गेली असती तर आपला चांगलाच उदो उदो झाला असता अशा उपरोधिक शब्दांत महापौरांनी आयुक्तांना खडसावले.

नेरूळ एमआयडीसीच्या नजीक असलेल्या शिवाजी नगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली असून पावसाळ्यात डोंगर भागातून आलेले पाणीही या रस्त्यावर येत असल्याने याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत असतो. या रस्त्याची डागडुजी व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नगरसेविका कविता आगोंडे प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. त्यालाही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कविता आगोंडे यांनी बुधवारी झालेल्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरले. त्यावेळी प्रशासनाने आपली बाजू मांडताच त्यांच्या भूमिकेवर महापौरांनी नाराजी व्यक्त केली आणि आयुक्तांना फैलावर घेतले. त्यावेळी या कामाची चाचपणी करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे यावेळी आयुक्तांनी सांगितले. आतापर्यंत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 350 शौचालयांच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून 50 शौचालयांसमोरील परिसरात मन प्रसन्न करणारे सुशोभिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या शौचालयांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन आमुलाग्र बदलला आहे.

त्याचसोबत नागरिकांसाठी 500 हून अधिक सार्वजनिक व सामुदायिक शौचालये नवी मुंबई महानगरपालिकेने उभारली आहेत. मात्र त्याचवेळी शहरातील बहुतांश रस्त्यांकडे आयुक्तांचा कानाडोळा झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. गत महिन्यात केंद्र शासनाची स्वच्छ भारत अभियानाची टीम नवी मुंबई शहरात आली असता त्यांना सुशोभित करण्यात आलेली ठिकाणेच दाखवण्यात आली. त्याचवेळी जर त्यांची नजर दुर्दशा झालेल्या रस्त्यांवर गेली असता तर या वेळी प्रथम 10 क्रमांकामध्येही आपला नंबर आला नसता, अशी चर्चा यावेळी राजकीय वर्तुळात सुरु झाली. सत्ताधारी नगरसेवकांची अनेक कामे अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने स्वच्छ भारत अभियान वेळीही त्या नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामाची लक्तरे काढली होती. त्यामुळे स्वच्छ भारत अभियान वेळी प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यात दुजाभाव असल्याचे आढळून आले.

रस्त्याच्या अनेक कामांना महासभेची मंजुरी असून ती प्रस्तावित आहेत. तर काही ठिकाणी कामे झालेली आहेत. शिवाजी नगर परिसरातीलही कामे प्रस्तावित असून लवकरच ती लवकरच मार्गी लागतील.
– रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

First Published on: February 21, 2019 4:56 AM
Exit mobile version