कॉलेजच्या आवारात झाडांची संख्या वाढणार

कॉलेजच्या आवारात झाडांची संख्या वाढणार

पर्यावरणसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबरच कॉलेजांमधील झाडांची संख्या वाढावी यासाठी आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पुढाकार घेतला आहे. कॉलेजांनी आपल्या आवारात अधिकाधिक झाडे लावावी, असे आवाहन यूजीसीकडून कॉलेजांना करण्यात आले आहे.

2015 मध्ये यूजीसीकडून राबवण्यात आलेल्या ‘एक विद्यार्थी, एक झाड’ या संकल्पेला कॉलेजांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे सध्या होत असलेली पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी आणि बदलत्या पर्यावरणाच्या स्थितीमध्ये झाडांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी व त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी यूजीसीने ही संकल्पना पुन्हा सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यातच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांना झाडे लावण्याचे आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठ कुलगुरू, संस्था चालक व कॉलेजांना पत्र लिहून आवारामध्ये झाडे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातील पत्र यूजीसीकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. कॉलेजांकडून राबवण्यात आलेल्या या संकल्पनेचा अहवाल यूजीसीकडे पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

First Published on: August 13, 2019 5:55 AM
Exit mobile version