महाविकासआघाडी झाली तरी सत्तास्थापनेची प्रक्रिया लांबणार

महाविकासआघाडी झाली तरी सत्तास्थापनेची प्रक्रिया लांबणार

फोटो - पॉलिटिकल समाचार

शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये एकमत झाले असून दिल्लीतील मॅरेथॉन बैठका संपल्यानंतर शुक्रवारपासून सत्तास्थापनेसाठी मुंबईत बैठकांचा सिलसिला सुरू होईल. त्यामुळे निवडणुकीनंतर महिन्याने राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मात्र राज्यात असलेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे सत्तास्थापनेची प्रक्रिया आठवडाभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू नसते तेव्हा निवडणुकीत बहुमत असलेला पक्ष किंवा आघाडी थेट राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतात आणि राज्यपाल संबंधित पक्षाला किंवा पक्षांच्या आघाडी-युतीला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करतात. पण महाराष्ट्रात झालेल्या सत्ताकोंडीमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे आता जरी महाविकासआघाडीची स्थापना होणार असली तरी प्रत्यक्ष सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणार आहे.

भाजपच्या हातात सूत्रे?
केंद्रीय गृहमंत्रालय आणि केंद्रीय मंत्रिमंडळदेखील भाजपच्याच ताब्यात आहे. खुद्द अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत. त्यांच्यावरच शिवसेनेकडून ठरलेला फॉर्म्युला मोदींपर्यंत पोहोचवण्यात आला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेच्या प्रस्तावाला भाजप सरकार म्हणजेच पर्यायाने नरेंद्र मोदी आणि अमित शहा मंत्रिमंडळाची मंजुरी किती दिवसांत किंवा तासांत देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

First Published on: November 22, 2019 5:20 AM
Exit mobile version