डिजेच्या तालावर अंबामातेचे आगमन

डिजेच्या तालावर अंबामातेचे आगमन

DJ

मुंंबई:मुंबई हायकोर्टाने डॉल्बी आणि डीजेवर बंदी घातली आहे. या बंदीमुळे नुकताच पार पडलेला गणेशोत्सवात मंडळांचा हिरमोड झाला होता. परंतु नवरात्रोत्सवात मंडळांनी मिरवणुकीच्या दरम्यान डीजेला पसंती दिल्याचे दिसून आले. मुंबईतील अनेक सार्वजनिक मंडळांनी भव्यदिव्य असे श्री अंबामातेचे आगमन सोहळे आयोजित केले होते. यात प्रामुख्याने दक्षिण मुंबई, सायन, दादर अशा अनेक ठिकाणी हे आगमन सोहळे पार पडले. या आगमन सोहळ्यानंतर आता अनेक मंडळांनी रास गरबा आणि दांडियासाठीही डीजेला पसंती दाखवली आहे. तर अनेकांनी लाइव्ह ऑक्रेस्ट्राला पसंती दाखवल्याचे चित्र मुंबईत सर्वत्र दिसून आले.

मुंबई हायकोर्टाने डॉल्बी डीजेला बंदी घातल्याने गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला आहे. या वादात सार्वजनिक गणेशमंडळांना गणेश आगमन आणि विसर्जन सोहळा डिजेशिवाय आायेजित करावे लागले होते. अनेक मंडळांनी ही बंदी झुगारुन डीजे वापरल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यामुळे हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आले आहे. गणेशोत्सव मंडळाचा हा प्रश्न चर्चेत असताना मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या नवरात्रोत्सव मंडळांच्या आगमन सोहळ्यात सरार्सपणे डीजे वापरला गेल्याचे चित्र दिसून आले आहे. प्रामुख्याने दक्षिण मुंबई, दादर, सायन या भागात डीजे लाविल्याची माहिती समोर आली आहे. सध्या नाशिक आणि पुणेरी ढोल ताशा-पथकांना कमालीची मागणी आहे. पण नवरात्रोत्सव मंडळाच्या वाढत्या संख्येमुळे सर्वच मंडळांना या पथकांची व्यवस्था न करण्यात आल्याने अनेकांनी डीजे लावणे पसंत केले आहे. गणेशोत्सवादरम्यान ज्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली, अशा प्रकारची कारवाई नवरात्रोत्सव मंडळांवर करण्यात आली नसल्याचे यावेळी समोर आले.

या आगमन मिरवणुकीप्रमाणेच अनेक मंडळांच्या रास गरब्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अनेक मंडळांनी लाईव्ह ऑक्रेस्ट्रा ठेवत गरब्याचे आयोजन केले आहे. परंतु अनेक मंडळांनी पूर्वीप्रमाणेच डीजे आणि स्पीकरलाच पसंती दिल्याची माहिती मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे. स्पीकर्स किंवा डॉल्बी लावली असली तरी आम्ही आवाजाची मर्यादा पाळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. तर पोलिसांकडून ही या मंडळांची झाडाझडती घेण्याचे निर्णय घेण्यात आला असून रात्रीच्यावेळी गस्तीत वाढ करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

First Published on: October 11, 2018 12:54 AM
Exit mobile version