मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे कापण्याचा प्रस्ताव फेटाळला

मेट्रोच्या कारशेडसाठी झाडे कापण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई महापालिका

आरेतील मेट्रो कार शेडच्या बांधकामात बाधित होणार्‍या झाडांची कापणी करण्याचा वादग्रस्त प्रस्ताव पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत नामंजूर करण्यात आला. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आणि आदिवासी पाण्यातील लोकांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात न आल्याने हा प्रस्ताव पुन्हा प्रशासनाकडे परत पाठवून देण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी जोरदार बॅटिंग केली. परंतु शिवसेना, काँग्रेसच्या विरोधापुढे त्यांना आपली भूमिका सक्षमपणे मांडल्यानंतरही बहुमताच्या जोरावर प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची वेळ आली.

असा झाला वृक्षतोडीला विरोध

आरे वसाहतीतील मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पांतर्गत मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी २ हजार २३८ झाडे कापण्यास आणि ४६४ झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच ९८९ झाडे आहेत तशीच ठेवण्यासाठीचा प्रस्ताव २१ जुलै २०१७ रोजी वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता. त्यानंतर सदस्यांनी केलेल्या मागणीनंतर याची मंगळवारी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी झालेल्या वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि काँग्रेसचे जगदीश अमित कुट्टी आदींनी जोरदार विरोध करत प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. यावेळी काही सदस्यांनी या जागेवर सुमारे ६०० झाडे ही सुबाभूळ असल्याचे सांगितले. हे सुबाभूळ नसून कुबाभूळ ठरत आहे. या झाडांमुळे कोणतेही ऑक्सिजन मिळत नाही की त्यावर पक्षी घरटे बांधत नाही. शिवाय ना या झाडांवर आदिवासांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे ही ६०० झाडे कापण्यास काहीच हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर शिवसेनेच्या सुवर्णा करंजे यांनी हे कारशेड कांजूरमधील मोकळ्या जागेत हलवले जावे अशी सूचना केली. भविष्यात मेट्रो ६ येत असून त्यासाठी कांजूरमार्गची जागा योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर भाजपचे अभिजित सामंत यांनी राष्ट्रीय महामार्गासाठी अनेक झाडे कापण्यात आली आहेत. त्या एक्सप्रेस-वेचे नामकरण सध्या विरोधी पक्षात बसलेल्यांनी ‘यशवंतराव चव्हाण महामार्ग’ असे केले आहे. त्यामुळे तेव्हा झाडे कापताना विरोध का झाला नाही? असा सवाल केला.

हेही वाचा – ‘भाजपसोबतचा निर्णय येत्या १० दिवसांत घेईन’

मेट्रोच्या प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांनी केले प्रयत्न

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी लंडनपेक्षाही आपल्या येथे प्रदूषण कमी असल्याचे सांगत जेव्हा कावळ्यांची संख्या वाढते तेव्हा पक्ष्यांची संख्या कमी होत असते, याची उदाहरणे दिली. मेट्रोचा हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आयुक्तांनी शर्थीचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि विरोधी पक्षाने त्याला साथ दिल्यामुळे बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव दप्तरी दाखल करावा लागला. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका बजावली होती.

मुंबई मेट्रो विरोधात एफआयआर 

मेट्रो रेल्वेच्या कारशेडच्या बांधकामाला सुरुवात झालेली असून ५ हेक्टर जागेवर झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबई मेट्रो विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांची जी काही मते मांडली आहे, त्यांची उत्तरे मिळायला हवी. आम्ही कारशेडच्या बांधकामातीलच झाडे कापण्याच्या विरोधात आहोतच, शिवाय इतर वृक्षतोडीविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोचा प्रस्ताव अपूर्ण असल्याने तो परत पाठवला असून प्रशासनाने याबाबत लेखी उत्तरे दिल्यानंतर जर सदस्यांचे समाधान झाल्यास पुढे याचा विचार केला जाईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

First Published on: August 21, 2019 8:03 PM
Exit mobile version