पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध

Shivsena Mahila

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ठाणे, पालघर, रायगड, कल्याण डोंबिवली, भिवंडी परिसरात नागरिक, राजकीय पक्ष, संस्थां संघटनांनी तीव्र निषेध केला. कल्याणातील बिर्ला कॉजेलजमध्ये तसेच ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडा जाळण्यात आला. तर अनेक ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली. उल्हासनगरात रिक्षा संघटनांनी दुपारच्या वेळेत रिक्षासेवा बंद केल्या. तर अनेक पाकिस्तानविरोधी घोषणा देत ठिकाणी निदर्शने करण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत स्त्री आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला.

कल्याण पूर्वेत नागरिकांनी भव्य रॅली काढली. या रॅलीत मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. त्याप्रमाणे पूर्वेतील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली. कल्याण शिवाजी चौकातही भाजपने निदर्शने केली. ठाण्यातील चिंतामणी चौकात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा पुतळा आणि पाकिस्तानचा झेंडा जाळला. ठाण्यातील राबोडी येथील आकाशगंगा रोडवर नागरिकांनी सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मुंब्रासारख्या मुस्लीम बहुल भागात मुस्लीम समाजाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाक लष्करप्रमुख कमर जावेद बावजा यांचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला. दारुल फलाह मशीदीसमोर जमा झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जुम्माचा नमाज अदा केल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. तसेच उपस्थित मुल्ला-मौलवींनी शहीद जवानांसाठी दुवा पठण केले. भिवंडीतील जुना जकात नाका, स्व.आनंद दिघे चौक येथे हिंदू मुस्लिम नागरिकांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि दहशतवादी मसूद अझरचा पुतळा जाळला आणि कँडल मार्च काढला. तर उल्हासनगर महापालिकेत सर्व नगरसेवकांनी आपल्या 1 महिन्याचे वेतन आणि सभेचा भत्ता तसेच प्रशासनाच्या वतीने 10 लाखांची आर्थिक मदत शाहिदांच्या कुटुंबियांना जाहीर केली. शहापूरमध्ये म.ना.बरोरा माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.निदर्शने करून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला.

First Published on: February 16, 2019 4:59 AM
Exit mobile version