Corona: क्वारंटाईन सेंटरला हॉटेलचा पर्याय; मात्र नागरिकांनी स्वतः करावा खर्च!

Corona: क्वारंटाईन सेंटरला हॉटेलचा पर्याय; मात्र नागरिकांनी स्वतः करावा खर्च!

प्रातिनिधीक फोटो

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिकेने शहरात अलगीकरण केंद्र (क्वारंटाईन सेंटर) व विलगीकरण केंद्र (आयसोलेशन सेंटर) बनविले आहेत. मात्र या केंद्रांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा नाहीत, अशा तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. अशा नागरिकांसाठी हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय मनपा प्रशासनाने दिला आहे. मात्र तो सर्व खर्च ज्यांना उच्च दर्जाच्या सुविधा पाहिजे अशा नागरिकांनी स्वतः करावा, असे मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

जगभरात कोरोना साथरोगाचा प्रसार व त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन व महानगरपालिका स्तरावर विलागीकरण केंद्र, अलगीकरण केंद्र व कोव्हीड – १९ रुग्णालय या त्रिस्तरीय सूत्रांचे पालन करीत उल्हासनगर – ५ येथे क्वांरंटाईन सेंटर तर उल्हासनगर – ३ येथे रेड क्रॉस हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन सेंटर, उल्हासनगर – ४ येथे शासकीय प्रसुतीगृहाचे रूपांतर कोव्हीड- १९ मध्ये महानगरपालिकेने केले आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वारंटाईन सेंटर व आयसोलेशन सेंटरमध्ये असलेले बहुसंख्य व्यक्ती त्याला चांगला प्रतिसाद देखील देत आहेत. सध्या रुग्णाची संख्या ७० च्या आसपास असून क्वांरंटाईन व आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवलेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आता मात्र या सेंटर मध्ये आर्थिकदृष्ट्या सबल व उच्च राहणीमान असलेले काही नागरिक या सेंटरबाबत तक्रारी करत असून त्यांना सुविधा अपेक्षित असलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत आहेत. यावर तोडगा म्हणून मनपा आयुक्तांनी उल्हासनगर – ३ येथील शांतीनगर परिसरातील सेंट्रल पार्क हॉटेल, विठ्ठलवाडी परिसरातील साई प्लाझा हॉटेल या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर तर सी ब्लॉक येथील डॉल्फिन क्लब हे आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र हॉटेलचा खर्च त्या रुग्णाने स्वतः करायचा आहे, असे परिपत्रकाद्वारे मनपा आयुक्तांनी जाहीर केले आहे.

मनपाच्या या निर्णयामुळे शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा यांच्या मते हा निर्णय हॉटेल व्यावसायिकांच्या हिताचा आहे. शहरात अनेक धर्मशाळा आहेत त्यामध्ये चांगल्या सुविधा देऊन क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात येऊ शकते. राज्यात अनेक पंचतारांकित हॉटेल, थ्री स्टार हॉटेल्स त्यांच्या मालकांनी कोरोनाच्या लढ्यासाठी मोफत दिले आहेत असे असतांना उल्हासनगर मधील हॉटेल मालकांनी देखील त्यांची हॉटेल्स मोफत द्यावेत, अशी मागणी सोशल मीडियाद्वारे केली जात आहे.


धक्कादायक! क्वारंटाईन कक्षातच महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी
First Published on: May 13, 2020 11:26 PM
Exit mobile version