माहुलवासीयांचे मुख्यमंत्र्यांना दोन हजार पत्राद्वारे निवेदन

माहुलवासीयांचे मुख्यमंत्र्यांना दोन हजार पत्राद्वारे निवेदन

Mahul

प्रतिनिधी:- एचडीआयएलने कुर्ला येथे बांधलेल्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा यासाठी शुक्रवारी माहुलवासीयांनी मुख्यमंत्र्यांना तब्बल दोन हजारपेक्षा जास्त पत्रांद्वारे निवेदन पाठवले. माहुलमधील मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत लवकरात लवकर स्थलांतर करावे, अशी विनंती पत्रामध्ये करण्यात आली आहे.कुर्ला येथे एचडीआयएलने बांधलेल्या संक्रमण शिबिरामध्ये साडेपाच हजार माहुलावासीयांचे स्थलांतर करण्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी माहुलवासीयांना दिले होते. याबाबत मुख्यमंत्र्याची भेट घेऊन चार दिवसांत चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले होते. परंतु चार दिवस उलटले तरीही कोणताही निर्णय झाला नाही.

माहुलवासीयांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आंदोलनाच्या ठिकाणापासून ते राजावाडी टपाल कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. ‘आमचे माहुल येथून लवकरात लवकर कुर्ला येथे स्थलांतर करा’ अशा आशयाचे निवेदनवजा पत्र मुख्यमंत्र्यांना टपालाद्वारे पाठवले. माहुलमधील सर्व नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पोस्टकार्ड टपालपेटीत टाकल्याने टपाल पेटीमध्ये भरून गेली. त्यामुळे टपाल कार्यालयातील अधिकार्‍यांनी वेगळ्या गोणीमध्ये त्यांचे पत्र जमा करून घेतले, अशी माहिती ‘घर बचाओ, घर बनाओ’ आंदोलनाचे समन्वयक बिलाल खान यांनी दिली.

मुंबई महापालिकेचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिलेल्या आश्वासनांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा यासाठी नुकतीच महापौरांची भेट घेतली होती. यावेळी एमएमआरडीए, म्हाडाचे अधिकारीही उपस्थित होते. अधिकार्‍यांनी माहुलवासीयांना अन्यत्र घरे देण्याबाबत थोडीशी नाराजी दाखवली असली तरी महापौरांनी माहुल येथील वातावरण प्रदूषित असल्याचे मान्य करत त्यांना अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत सकारात्मकता दर्शवत 16 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले. परंतु मुख्यमंत्री मुंबईबाहेर असल्याने मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही. त्यामुळे अधिवेशनादरम्यान त्यांची भेट घेण्याचे आम्ही प्रयत्न करू असे बिलाल खान यांनी सांगितले.

अशी केली पत्रातून विनंती

शुक्रवार, 16 नोव्हेंबर रोजी माहुल प्रकल्पग्रस्त पिडीतांचा ‘जीवन बचाओ’ आंदोलनाचा 20 वा दिवस. आमच्या कुटुंबियांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहोत. कृपया आपण आमचे स्थलांतर माहुल येथून एचडीआयएल कुर्ला येथे करावे व हजारो कुटुंबीयाचे जीव वाचवावे, ही विनंती.

First Published on: November 17, 2018 5:15 AM
Exit mobile version