आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात लेखणीऐवजी झाडू

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हातात लेखणीऐवजी झाडू

सफाईकामगारांची पदे रिक्त असल्याचा परिणाम

राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर आदिवासी प्रकल्पाच्या आश्रमशाळात सफाईगारांची पदे रिक्त असल्याने आश्रमशाळांतील आदिवासी विद्यार्थ्यांकडूनच रोज वर्ग खोल्या आणि वसतीगृहाची साफसफाई करुन घेतली जात आहे.

शहापूर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत शहापूर, भिवंडी , मुरबाड, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथे एकूण 23 आश्रम शाळा आणि 12 वसतीगृहे आहेत. या शाळा, वसतीगृहांची दैनंदिन साफसफाई ठेवण्याकरीता सफाईगार म्हणून श्रेणी वर्ग 4 ची एकूण 26 पदे कागदोपत्री मंजूर आहेत. यातील केवळ 20 सफाईगारांची पदे भरण्यात आली आहेत. तर अध्यापही 6 सफाईगारांची पदे रिक्त असल्याची माहिती शहापूर आदिवासी प्रकल्प कार्यालयातून हाती आली आहे.

दरम्यान सफाईगारांची पदे गेली अनेक वर्ष भरली गेली नसल्याने ज्या आश्रमशाळांवर सफाईगार पदे रिक्त आहेत त्या आश्रमशाळांत आदिवासी विद्यार्थ्यांकडून वसतीगृह आश्रमशाळांतील वर्ग खोल्यांच्या व व्हरांड्याच्या लाद्या धुणे, रोज शाळेच्या आवारातील पटांगणात झाडू मारुन केरकचरा उचलणे, पाणी भरणे आदी कामे काही शाळेचे मुख्याध्यापक तसेच अधीक्षक करू घेत आहेत. हा संतापजनक प्रकार शहापूर आदिवासी प्रकल्पाच्या बहुतांश आश्रमशाळेत पाहण्यास मिळतो आहे. सफाईगारांच्या रिक्त पदांबाबत अधिक माहिती घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे शहापूर प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

First Published on: February 4, 2019 4:01 AM
Exit mobile version