माहिममधील चौकाला देण्यात येणार शहीद जवान कौस्तुभ राणेंचे नाव

माहिममधील चौकाला देण्यात येणार शहीद जवान कौस्तुभ राणेंचे नाव

शहीद मेजर कौस्तुभ राणे

काश्मीरच्या बांदीपोरातील गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचे नाव माहिममधील चौकाला देण्यात येणार आहे. मिया मोहम्मद छोटानी मार्गाला छेदणार्‍या रोड क्रमांक दोनच्या रस्त्यावरील चौकाला कौस्तुभ राणे यांचे नाव दिले जाणार आहे. विशेष म्हणजे मुस्लिम व्यक्तीचे नाव असणाऱ्या चौकाला दिले जाणारे शहीद कौस्तुभ राणेंचे नाव हे प्रत्येक भारतीयांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे ठरणार आहे.

माहिममधील प्रभाग क्रमांक १९० मधील मिया मोहम्मद छोटानी मार्गास, छेद मार्ग क्रमांक २ पिंक रोज इमारतीसमोर जेथे छेदतो तेथे तयार झालेल्या चौकास शहीद कौस्तुभ प्रकाश राणेंचे नाव देण्याची मागणी स्थानिक भाजपच्या नगरसेविका शितल गंभीर यांनी केली आहे. कोकणातील वैभववाडी येथील कौस्तुभ राणे यांना ७ ऑगस्ट २०१८ रोजी जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांना रोखताना झालेल्या चकमकीत वीरमरण आले.

‘देशासाठी बलिदान दिलेल्या भारतमातेच्या या थोर सुपुत्राची प्रेरणादायी स्फुर्ती जनमानसांत अखंड राहावी, यासाठी त्यांचे नाव या रस्त्यांवरील चौकाला देण्याची मागणी आपण केल्याचे’, शितल गंभीर यांनी स्पष्ट केले. या चौकाचे नामकरण यापूर्वी झालेले नसल्याने, हे नाव देण्याची शिफारस केलेला प्रस्ताव आता स्थापत्य शहर समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या समितीच्या मान्यतेनंतर या चौकाला शहीद कौस्तुभ राणे यांचे नाव दिले जाणार आहे.

First Published on: February 21, 2020 6:16 PM
Exit mobile version