शौचालयात सात फूटी अजगर

शौचालयात सात फूटी अजगर

अजगर

भांडूप परिसरात राहणार्‍या विनय ढोबळे यांच्या शौचालयात शुक्रवारी सात फुटी अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली. ढोबळे यांच्या पत्नीला शौचालयात भलामोठा अजगर पाहून चक्कर आली. मध्यरात्रीच्या सुमारास विनय यांनी शौचालयाचा दरवाजा उघडला तेव्हा शौचालयाच्या पॉटमध्ये अजगर पाहून त्यांचे धाबे दणाणले. ढोबळे यांनी लगेच दरवाजा बंद करुन बाहेरुन कडी लावली. महापालिका वसाहतीत तळ मजल्यावर राहणार्‍या विनय ढोबळे हे लगेच पत्नी आणि मुलांना घेऊन घराबाहेर पडले व शेजार्‍यांना जागे करुन त्यांना या प्रकाराची माहिती दिली.

सुदैवाने त्यावेळी ढोबळे यांच्या शेजारी राहणार्‍या अक्षय पाटकरकडे सर्पांची सुटका करणार्‍या एका संस्थेचा फोन नंबर होता. रात्री दोनच्या सुमारास विनय ढोबळे यांच्या घराच्या शौचालयाच्या पॉटमधून सर्पमित्रांनी या अजगराची सुटका केली. विनय ढोबळे ज्या ठिकाणी राहतात तो परिसर संजय गांधी नॅशनल पार्कजवळ आहे.

ढोबळे यांच्या घरापासून काही अंतरावर काही तासांनी आणखी एक अजगर सापडला. हा अजगर नागरी वस्तीपर्यंत कसा पोहोचला हे सांगता येणे अवघड आहे. मात्र, भक्ष्याच्या शोधात जलवाहिनीमधून हा अजगर घराच्या शौचालयापर्यंत आला असावा असा अंदाज सर्पमित्राने व्यक्त केला.

First Published on: April 6, 2019 4:32 AM
Exit mobile version