जन्मदात्या मातेचे अवयवदान करण्याचा मुलाचा धाडसी निर्णय

जन्मदात्या मातेचे अवयवदान करण्याचा मुलाचा धाडसी निर्णय

अवयवदान

आपल्याला जन्म देणारी अचानकपणे या जगातून निघून जाते, हे दु:ख विसरुन त्या मातेचे अवयवदान करण्याचा धाडसी निर्णय एका मुलाने घेतला आहे. या अवयवदानातून तिघांना जीवदान मिळायला मदत झाली आहे. आपल्यासाठी दिवसरात्र झटणारी आई मृत्यूनंतर अवयवरुपी जीवंत राहावी या हेतूने उरणमधील एका मुलाने त्याच्या ६० वर्षीय ब्रेनडेड आईचे अवयव दान केले आहेत. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये या महिलेचे अवयवदान करण्यात आले आहेत. त्यानुसार, मुंबईत आतापर्यंत ५७ अवयवदानाची नोंद करण्यात आली आहे.

उरणमध्ये राहणाऱ्या ६० वर्षीय लक्ष्मीबाई उबाळे (बदललेलं नाव) यांची गेल्या अनेक महिन्यांपासून प्रकृती खालावली होती. उपचार घेऊनही त्यांना बरं वाटत नव्हतं. दिवसेंदिवस प्रकृती बिघडत चालली होती. शिवाय, वय जास्त असल्याने त्या उपचारांनी प्रतिसाद देत नव्हत्या. अखेर प्रकृती आणखी बिघडल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना ४ सप्टेंबर म्हणजेच बुधवारी नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचारही सुरू केले. पण, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होऊ लागला आणि डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले.

याविषयी अधिक माहिती देताना नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलचे झेडटीसीसी समन्वयक मदन मोरे यांनी सांगितलं की, ‘‘५ सप्टेंबरला या महिलेला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. त्यानंतर आम्ही अवयवदान करण्यासाठी नातेवाईकांचं समुपदेशन केलं. अवयवदानाबाबत महिलेच्या मुलाला कल्पना होती. त्यामुळे, त्याने आपल्या आईचे अवयवदान करायला परवानगी दिली आणि अवयवरूपी आपल्या आईला जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला.”

हे अवयव केले दान

‘‘या महिलेचे यकृत, मूत्रपिंड दान करण्यात आलं आहे. झेडटीसीसीच्या नियमावलीनुसार यकृत आणि एक मूत्रपिंड अपोलो हॉस्पिटलमधील गरजू रुग्णांना दान करण्यात आले आहे. तर, दुसरे मूत्रपिंड जसलोक हॉस्पिटलमध्ये दान केलं आहे. काही अडचणीमुळे हृदय दान करता आलं नाही,’’ असंही मोरे यांनी सांगितलं.

First Published on: September 6, 2019 6:36 PM
Exit mobile version