मुंबईत ह्रदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाला वेग

मुंबईत ह्रदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाला वेग

हृदय

मुंबईत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत थोड्याच प्रमाणात जनजागृती आहे. अनेक उपक्रम हाती घेऊनही अवयवदानाबाबत तितकासा प्रतिसाद मुंबईसह संपूर्ण राज्यात मिळत नाही. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईत हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियांना वेग मिळत असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यांत हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाच्या बऱ्याच शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अवयव दान आणि प्रत्यारोपण करण्यासाठी काही प्रमाणात का होईना लोक पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे. ग्लोबल हॉस्पिटलमधील तीन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. भारतात फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत १६ हृदय प्रत्यारोपण, ७४ फुप्फुस प्रत्यारोपण आणि १६ हृदय आणि फुप्फुस जोड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशात गेल्या अडीच वर्षांत झालेल्या या सर्वाधिक शस्त्रक्रिया आहेत.

ग्लोबल हॉस्पिटल्समधील डॉक्टरांनी सांगितले की, “प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत आजही अनेक रुग्ण आहेत. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरवर उपचार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे”. ग्लेनइगल्स ग्लोबल हॉस्पिटलच्या हृदय आणि फुप्फुस कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संदीप अत्तावार यांनी सांगितलं की, “भारतामध्ये मृत व्यक्तीच्या हृदयाचे आणि फुप्फुसांचे जतन करणे खूप आव्हानात्मक काम आहे. मेंदूमृत (ब्रेनडेड) व्यक्तीच्या शरीरातील सर्वप्रथम हानी पोहोचणारी इंद्रिये म्हणजे हृदय आणि फुप्फुसे. त्यांचे व्यवस्थापन चांगले झाले नाही, तर लगेचच त्यांचा ऱ्हास होऊ लागतो. दर १० देहदानांपैकी ७ ते ८ केसेसमध्ये यकृत व मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण शक्य होते. मात्र, १० देहदानांपैकी केवळ १ ते २ वेळा फुप्फुसांचे दान शक्य होते. यासाठी योग्य उपाय योजनांची गरज पडते. तंत्रज्ञान, औषधे आणि शस्त्रक्रियेच्या प्रक्रियांमधील प्रगतीमुळे हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपण झालेले रुग्णही आता अधिक काळ जगत आहेत. त्यामुळे, जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदान करण्यासाठी आणि ते ही योग्य वेळेत यासाठी पुढाकार घेतला पाहिजे”.

First Published on: July 1, 2019 8:43 PM
Exit mobile version