‘कोरोना’वर मोफत उपचार घोषणेतून राज्य सरकारची ‘बनवाबनवी’

‘कोरोना’वर मोफत उपचार घोषणेतून राज्य सरकारची ‘बनवाबनवी’

राज्य सरकारने सर्व कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची केलेली घोषणा ही निव्वळ बनवाबनवी असून, नागरिकांची फसवणूक आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून ठाण्यातील रुग्णालयात गंभीर स्थितीतील रुग्णांवरच मोफत उपचार केले जातात. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी पत्राद्वारे केला आहे.

राज्य सरकारने २३ मे रोजी अध्यादेश काढून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत सर्व कोरोनाबाधित रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यात पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिकाधारकांना समाविष्ट करण्यात आले होते. या योजनेनुसार राज्यातील सर्व नागरिकांचा योजनेत समावेश झाला होता. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, कोरोना बाधीत रुग्णांवर मोफत उपचार व्हायला हवेत.

मात्र, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी झालेल्या हॉस्पीटलमध्ये केवळ गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचार केले जातात. तर सौम्य रुग्णांवर उपचाराची तरतूद नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात येते. अशा रुग्णांना किमान ५० ते ७० हजारांचे डिपॉझिट देऊन रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागत आहे. त्याचबरोबर औषधे, इंजेक्शनसाठी हजारो रुपयांचा भरणा करावा लागतो. काही रुग्णालयामध्ये तर आरोग्य योजनेचे प्रकरण मंजूर होईपर्यंत सर्वच रुग्णांकडून ५० हजारांची डिपॉझिट घेतली जाते. त्यामुळे कोरोना रुग्णांवर मोफत उपचाराची राज्य सरकारची घोषणा म्हणजे केवळ बनवाबनवी असून, सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना ई-मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी झालेल्या ठाण्यातील सर्व रुग्णालयामध्ये आपण चौकशी केली. त्यावेळी गंभीर स्थितीतील रुग्णावर मोफत उपचार होतील. सौम्य वा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी पैसे आकारले जात आहेत. रुग्णाची स्थिती पाहून आपण निर्णय घेऊ, असे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. मात्र, याबाबत कोणत्याही रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून लेखी माहिती देण्यात आली नाही, याकडे नगरसेवक पवार यांनी लक्ष वेधले आहे.

First Published on: June 22, 2020 8:29 PM
Exit mobile version