रेल्वेतून उतरणार्‍या महिलेची चोरट्याशी झटापट

रेल्वेतून उतरणार्‍या महिलेची चोरट्याशी झटापट

महिलांची पर्स हिसकावणार्‍या चोरट्यांचा पाठलाग

लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथे एक महिला प्रवाशी गाडीतून उतरत असतानाच अचानकपणे एका चोरट्याने तिच्या खांद्यावर लावलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या महिलेची थोडक्यात झटापट झाली, त्यात त्या महिलेचा तोल जावून ती थेट रेल्वे रुळावर पडून गंभीररीत्या जखमी झाली. तिच्यावर सध्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार असून सुदैवाने या घटनेत या महिलेचे प्राण वाचले आहेत. कुर्ला पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकमान्य रेल्वे टर्मिनस हे मुंबईतील लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी मोठे टर्मिनस आहे. याठिकाणाहून दररोज बर्‍याच संख्येने लांबपल्याच्या गाड्या सुटतात. तसेच येथे इतर राज्यांतून येणार्‍या गाड्यांची संख्यादेखील जास्त आहे. या टर्मिनस येथून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यात उत्तर प्रदेशात जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या टर्मिनसवर गर्दुल्ले, मवाली, चोरटे तसेच सराईत गुन्हेगारांचा कायम वावर असतो. प्रवाशांच्या बॅगा हिसकावणे, मोबाईल चोरी, तसेच तसेच धमकी देऊन पैसे वसूल करणे यांसारखे गुन्हे या ठिकाणी दररोज घडतात. १२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास या ठिकाणी अशीच एक घटना घडली, या घटनेत चोरट्याने केलेल्या हल्ल्यात एका प्रवासी महिलेचा जीव थोडक्यात वाचला.
या घटनेत गंभीर जखमी झालेली महिला चेंबूर येथील राहणारी असून समेधाबीबी हाफीज मोहमद शेख (४५) असे या महिलेचे नाव असून ती तिच्या १८ वर्षांच्या मुलासोबत पश्चिम बंगाल येथून १२ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास शालिमार एक्स्प्रेस मधून लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस या ठिकाणी आली होती. ट्रेनमधून सामान घेऊन उतरत असताना समेधाबीबी यांच्या खांद्यावर अडकवलेली बॅग अज्ञात चोरट्याने खेचली.

बेसावध असलेल्या समेधाबीबी अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गोंधळल्या आणि त्यांचा तोल जाऊन गाडीच्या मागच्या दारातून त्या रुळावर पडून जखमी झाल्या. त्यांना घेण्यासाठी आलेल्या पतीने ताबडतोब समेधाबीबी यांना रिक्षात बसवून राजावाडी रुग्णालयात आणले, तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना शीव रुग्णालय जाण्यास सांगितले. समेधाबीबी यांना शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा कसून शोध सुरू आहे. लवकरच या चोरट्याला अटक करण्यात येईल, असे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांनी सांगितले.

माझी पत्नी आणि मुलगा दोन महिन्यांनी मुंबईला परत येणार म्हणून मी त्यांना घेण्यासाठी लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस येथे त्यांना घेण्यासाठी आलो होतो. त्यावेळी ही घटना घडली. पत्नीच्या चेहर्‍यावर गंभीर इजा झाली आहे. तिचे प्राण वाचले हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
– हाफिज मोहम्मद शेख, जखमी महिलेचे पती

First Published on: December 19, 2018 4:00 AM
Exit mobile version