मूर्खपणामुळे चोर पोलिसांच्या जाळ्यात

मूर्खपणामुळे चोर पोलिसांच्या जाळ्यात

चोरी केली, तिथेच विक्री

चोर म्हटलं की, चोरी करुन त्या ठिकाणाहून पसार होणे हे त्याचे वैशिष्ठ्य असते. त्यामुळे अशा चोरांना पकडताना पोलिसांची दमछाक होते. कुर्ला रेल्वे स्थानकात मात्र अजब प्रकार उघडकीस आला आहे. चोराने फेरीवाल्याचे साहित्य चोरले आणि पळ काढायच्या ऐवजी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेरच ते साहित्य विकायला बसला. या साहित्यामध्ये महागड्या तेलाच्या बाटल्या, बिस्किट पुड्यांचे मोठे बॉक्स, आणि इतर साहित्याचा समावेश होता. ५०० रुपयांपेक्षा महागडे असणारे साहित्य हा चोर २०० किंवा ३०० रुपयांच्या किंमतीत विकत होता. त्यामुळे संशय आल्याने तो पकडला गेला आणि त्याने स्वत:चा गुन्हा कबूल केला.

रेल्वे स्थानकांच्या बाहेर बसणार्‍या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला जातो. मात्र फेरीवाले हटायला तयार नसतात. कुर्ला रेल्वे स्थानकात एका फेरीवाल्याचे सगळे साहित्य चोरीला गेले. पण फेरीवाला स्थानकाच्या बाहेरच विक्रीसाठी बसत असल्याने त्याने पोलिसांत तक्रारदेखील केली नव्हती. पण चोरानेच चुकीचे पाऊल उचलल्याने तो आपोआप पकडला गेला. त्याने आपला गुन्हादेखील कबूल केला. रात्रीच्या वेळी एका अल्पवयीन चोराने फेरीवाल्याचे साहित्य चोरले होते. पण ते साहित्य घेऊन पळून जाण्याऐवजी त्याने दुसर्‍याच दिवशी कुर्ला रेल्वे स्थानकातच फेरीवाल्याप्रमाणे तो माल विकायला सुरुवात केली. या साहित्यामध्ये महागड्या तेलाच्या बाटल्या, बिस्किटच्या पुड्यांचे मोठे बॉक्स, सौंदर्यप्रसाधनाचे साहित्य असा माल होता.

यातल्या बर्‍याचशा साहित्याची किंमत ५०० रुपयांच्या आसपास होती, मात्र आरोपीने चोरीचा माल असल्याने अगदी स्वस्तात साहित्य विकून पळण्याचे ठरवले होते. मिळेल तितके पैसे हातात येण्यासाठी ५०० रुपयांचे साहित्य तो ओरडून ओरडून २०० रुपयांना देत होता. मात्र या प्रकारामुळे बाजूला असणारे फेरीवाले त्याच्यावर ओरडू लागले. साहित्य महाग असूनदेखील इतक्या कमी किमतीत का विकत आहेस? कुठून आला आहेस? अशा प्रश्नांची त्याच्यावर सरबत्ती करण्यात आली. त्यावेळी तो घाबरला. त्याच्यावर संशय आल्याने फेरीवाल्यांनीच पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सदर आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याच्याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्याच्या या अजब चोरीमुळे सगळेच चक्रावले आहेत.

First Published on: January 14, 2019 6:50 AM
Exit mobile version