मुंबई विद्यापीठाकडे मराठी भाषांतरकार नाही

मुंबई विद्यापीठाकडे मराठी भाषांतरकार नाही

विधीची प्रश्नपत्रिका इंग्रजीत

भाषांतरकार उपलब्ध होत नसल्याचे कारण देत मुंबई विद्यापीठाकडून विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेत प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यावेळी मराठीतून लिहिलेली उत्तरपत्रिका कोण तपासते, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला असता विद्यापीठातील अधिकार्‍यांची बोबडी वळाली.

विद्यापीठाने विधीच्या विद्यार्थ्यांना मराठीमधून प्रश्नपत्रिका देणे बंद केल्यामुळे मराठीमधून उत्तरे लिहिणार्‍या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पाठपुरावा केला असता प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे अखेर गुरुवारी काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेत विद्यापीठाकडे मराठीमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

त्यांनी भाषांतरकार उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले. यावर विद्यार्थ्यांनी आम्ही मराठीत लिहिलेल्या उत्तरपत्रिका कोण तपासते, असा प्रश्न करताच कुलगुरूंसह अधिकार्‍यांची भंबेरी उडाली. विद्यापीठामार्फत घेण्यात येणारी विधीची परीक्षा दरवर्षी 15 ते 20 विद्यार्थी मराठीतून देतात.

विद्यापीठाला भाषांतरकार मिळत नसेल, तर विद्यापीठाने याची व्यवस्था करावी. तसेच राज्याच्या राजधानीतच मुंबई विद्यापीठाकडून मराठी भाषेला मिळत असलेले दुय्यम स्थान हे खेदजनक आहे.
– शोमितकुमार साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते

First Published on: December 28, 2018 4:58 AM
Exit mobile version