सुका कचरा विल्हेवाटीसाठी अत्याधुनिक पध्दतीचा वापर

सुका कचरा विल्हेवाटीसाठी अत्याधुनिक पध्दतीचा वापर

मुंबई महापालिकेच्यावतीने सुका व ओला कचर्‍याचे वर्गीकरण करून त्यांची स्वतंत्र विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले जात असले तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही. त्या आधुनिक पध्दतीने सुका कचरा विलगीकरण केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर भागात जमा होणारा हा सर्व सुका कचरा जमा करून त्याची कुलाबा येथील जागा दिली जाणार आहे. यासाठी नेप्रा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली जात असून कुलाबा येथील जागा या संस्थेला दिली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने ३८ सुका कचरा विलगीकरण केंद्रे सामाजिक संस्थांना चालवण्यात येत आहेत. याशिवाय ९६ टेम्पो सुका कचरा जमा करण्यासाठी देण्यात आले आहेत. महापालिकेच्यावतीने सुका कचरा वर्गीकरण तसेच जमा करून विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करूनही मोठ्याप्रमाणात सुका कचरा इतर कचर्‍यामध्ये मिसळला जातो. त्यामुळे या सुका कचर्‍याचे स्वतंत्रपणे विल्हेवाट लावली तर त्यापासून त्याचा पुनर्वापर तसेच पुनर्विक्री केली जावू शकते. त्यामुळेच मुंबईमध्ये आधुनिक कचरा विलगीकरण केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी इंदोर, अहमदाबाद,बेंगळुरु व गोवा आदी विविध शहरांमध्ये भेट देवून तेथे लावण्यात येणार्‍या सुका कचर्‍याच्या विल्हेवाटीच्या तंत्राचा अभ्यास केला. त्यानुसार हा निर्णय घेतला असून यामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा वर्गीकरण, सुका कचरा जमा करणे आणि तो वाहून नेणे तसेच त्यावरील प्रक्रिया आदींचा यामध्ये समावेश असेल. त्यामुळे यासाठी शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर यांसाठी सध्याचे तंत्रज्ञान आणि मुंबईसाठी योग्य अशी सुका कचरा प्रक्रिया पध्दत समजून घेण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवण्यात आले.

या निविदेमध्ये खासगी संस्थेने किमान ५० टन प्रतिदिन क्षमतेचा सुका कचरा प्रक्रिया यंत्र बसवून त्याची क्षमता २५० टन प्रतिदिन पर्यंत वाढवली जावी, अशी अट घातली होती. यामध्ये केवळ शहर भागासाठी एकमेव संस्था पुढे आली आहे. त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली. या संस्थेला सुका कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कुलाबा येथील सुरक्षा गार्डनचा ४८५० चौरस मीटरची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

प्रकल्प राबवण्यासाठी १५ वर्षांसाठी करार
पुढील १५ वर्षांसाठी ही जागा संबंधित संस्थेला दिली जाणार आहे. त्यानंतर आहे त्या परिस्थितीत जागेसह कार्यान्वित प्रकल्पाची यंत्रसाम्रगी महापालिकेला हस्तांतरीत केली जाईल, अशी अट करारात घालण्यात आली आहे. मात्र, या जागेवर सुका कचरा विल्हेवाटीशिवाय संबंधित संस्थेला कोणतेही काम करता येणार नाही. अन्य वापरासाठी या जागेचा वापर करण्यास महापालिकेला परवानगीही देणार नाही,अशाही अटींचा समावेश करण्यात आला आहे.स्थायी समितीने ठेवला प्रस्ताव राखूनशहर भागातील कचरा विल्हेवाटीसाठी संस्थेची निवड केल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. परंतु हा प्रस्ताव स्थायी समितीने राखून ठेवला आहे.

First Published on: September 14, 2019 2:01 AM
Exit mobile version