वाडा-भिवंडी रस्त्यावरील खड्ड्याने घेतला डॉक्टरचा बळी

वाडा-भिवंडी रस्त्यावरील खड्ड्याने घेतला डॉक्टरचा बळी

डॉ. नेहा आलमगीर शेख (23, रा.कुडूस )

बुधवारी रात्री दहाच्या सुमारास वाडा-भिवंडी रस्त्यावरील दुगाड फाटा येथे खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात ट्रकखाली सापडून एका डॉक्टर तरुणीचा बळी गेला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रात्रीच टोलनाका बंद पाडला. तसेच गुरुवारी सकाळी कुडूस येथे रास्ता रोको आंदोलन केले.

डॉ. नेहा आलमगीर शेख (23, रा.कुडूस ) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. येत्या 8 नोव्हेंबर रोजी तिचे लग्न निश्चित झाले होते. लग्नानिमित्त ती खरेदीसाठी ठाणे येथे आपल्या शाबान शेख या भावासोबत गेली होती. ती रात्री दुचाकीवरून घरी परतत होती. दुचाकी तिचा चुलत भाऊ चालवत होता व नेहा मागे बसली होती. ते दुगाड फाटा येथे आले असता येथील खड्ड्यामध्ये गाडी आदळल्याने ती खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक गाडी सोडून पसार झाला.

ही घटना समजताच गावकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली. वाडा-भिवंडी रस्त्याचे काम सुप्रीम कंपनीकडे आहे. पण, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने गेल्या दहा वर्षांत अनेकाचे बळी गेेले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात तर कुडूसजवळील एका पुलाला मोठे भगदाड पडल्याची बाब उजेडात आली होती. त्यामुळे सुप्रीम विरोधात या भागात प्रचंड रोष आहे. नेहाचा मृत्यू झाल्यानंतर श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच या मार्गावरील टोलनाका बंद पाडला. तर गुरुवारी सकाळी अपघाताच्या निषेधार्थ कुडूस येथे गावकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सुप्रीम कंपनी विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.

डॉ. नेहा हिचे लग्न सफाळे पालघर येथील डॉ. ताहिर असर यांच्याशी 7 नोव्हेंबर रोजी होणार होते. मात्र नेहाला या दुर्घटनेमुळे जगाचा निरोप घ्यावा लागल्याने शेख आणि आसर या दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. या अपघात प्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र आव्हाड करीत आहेत.

First Published on: October 11, 2019 6:36 AM
Exit mobile version