दादर हॉकर्स प्लाझाचे वाहनतळ कचर्‍याने गिळले

दादर हॉकर्स प्लाझाचे वाहनतळ कचर्‍याने गिळले

dadar Hawker's Plaza

दादरच्या हॉकर्स प्लाझा येथील समोरील वाहनतळाच्या मोकळया जागेवर अतिक्रमण करून महापालिकेने यावर ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी बांधकाम करून वेस्ट कन्व्हर्टर बसवला आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही महापालिकेने यावर बांधकाम केले आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून या बांधकामामुळे गाळेधारकांसह ग्राहकांनी आपली वाहने कुठे उभी करायची असा सवाल उपस्थित होत आहे.

दादर हॉकर्स प्लाझा इमारतीसमोरील गाळेधारकांचे पुनर्वसन येथील इमारतीत केल्यानंतर येथील मोकळ्या जागेचा वापर वाहनतळासाठी करण्यात येत होता. बाजार विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त संजय कुर्‍हाडे यांनी तत्कालिन महापौरांकडे झालेल्या बैठकीत ही जागा वाहनतळासाठी राखीव असल्याचे सांगितले होते. परंतु आता याच जागेवर वेस्ट कन्व्हर्टर यंत्र बसवण्यात आले आहे. हे वेस्ट कन्व्हर्टर यंत्र क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत बसवण्यात येणार होते. परंतु तिथे न बसवता हॉकर्स प्लाझाच्या वाहनतळाच्या जागेवर बसवण्यात आले.

यापूर्वी या जागेवर वेस्ट कन्व्हर्टर बसवण्याचा प्रयत्न करताच गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हे काम थांबवलेले असतानाच मंगळवारी वाहनतळाच्या या जागेवर विटांचे बांधकाम करून संरक्षक भिंत बांधण्याचे काम करण्यात आले. या बांधकामामुळे गाळेधारकांच्या वापरात असलेल्या वाहनतळाची जागा गेली आहे. त्यामुळे याचा सर्वच गाळेधारकांनी विरोध केला आहे. याठिकाणी ९०० हून अधिक होलसेल विक्रेते आणि याठिकाणी खरेदीला येणार्‍या ग्राहकांनी वाहने कुठे उभी करायची असा सवाल उपस्थित होत आहे. याची तक्रार मिळाल्यानंतर रवी राजा यांनी घटनास्थळी भेट दिली.

हे बांधकाम करून अधिकार्‍यांनी एकप्रकारे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. वाहनतळाच्या जागा बांधकाम केल्यामुळे येथील ९०० विक्रेते आणि ग्राहकांनी आपली वाहने कुठे उभी करायची असा सवाल दादर हॉकर्स घाउुक भाजीपाला व्यापारी संघाचे जे.डी. तिवारी यांनी केला आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील मंडई आणि दादर हॉकर्स प्लाझा या दोन इमारती असल्या तरी त्याचा भूखंड एकच आहे. त्यामुळे नाना पाटील मंडईचा कचरा हॉकर्स प्लाझाच्या आवारात नको असे म्हणता येणार नाही. हॉकर्स प्लाझाच्या समोरील जागेचा वापर गाळेधारक हे वाहनतळासाठी करत असतील. परंतु नव्या विकास आराखड्यात वाहनतळासाठी ही जागा दाखवलेली नाही तर कचरा विल्हेवाटीसंदर्भातील जागेसाठी राखीव आहे. त्यामुळे तिथे वेस्ट कन्व्हर्टर बसवून ओल्या कचर्‍यांवर प्रक्रिया केली जाणार आहे.
डॉ. संगिता हसनाळे, सहायक आयुक्त, बाजार विभाग

First Published on: February 14, 2019 5:11 AM
Exit mobile version