पडणार होता पाऊस पण पडले लख्ख ऊन!

पडणार होता पाऊस पण पडले लख्ख ऊन!

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईमध्ये सलग दोन दिवस मुसळधारा कोसळण्याचा अंदाज बुधवारी हवामान खात्याने वर्तवला होता. परंतु हवामान खात्याचा अंदाज चुकवत पावसाने पाठ फिरवल्याने गुरुवारी मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र हवामान खात्याच्या चुकलेल्या अंदाजाचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसणार आहे. जाहीर केलेल्या पावसाच्या सुट्टीमुळे सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे अवघड होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तास व दिवस लागणार असल्याने विद्यार्थ्यांच्या दिवाळीची सुट्टी कमी होण्याची शक्यता शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये सलग दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मागील दिवसांमध्ये होत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. पावासाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनीही सकाळपासून सावधनता बाळगत प्रवास केला; परंतु दुपारपर्यंत पावसाची कोणतीच चिन्हे न दिसल्याने अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.

हवामान खात्याच्या अंदाजामुळे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी रात्री उशीरा ट्विटरवरून शाळांना सुट्टी जाहीर केली. परंतु शिक्षण विभागाचे परिपत्रक सकाळी पोहचेपर्यंत सकाळच्या सत्रातील शिक्षक व विद्यार्थी शाळेत आले. त्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा व्यवस्थित झाल्या, परंतु दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आला. परंतु पाऊसच पडला नसल्याचे जाहीर केलेली सुट्टी वाया गेली.

यंदा दिवाळी लवकर येत असल्याने दिवाळीपूर्वी होणार्‍या सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या शिक्षकांना वर्षभरात 200 दिवस तर सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या शिक्षकांना वर्षभरात 220 दिवस पूर्ण करावे लागतात. पावसामुळे यंदा अनेकदा सुट्ट्या जाहीर कराव्या लागल्याने बरेच दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे शिक्षकांना उर्वरित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यातच गुरुवारी दिलेल्या सुट्टीमुळे वेळ वाया गेल्याने शिक्षकांसमोर सहामाही परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या सुट्टीमुळे शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. अभ्यासक्रमाचे दिवस भरून काढण्यासाठी शिक्षकांना दिवाळीची सुट्टी कमी करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्टीचा परिणाम दिवाळी सुट्टीवर होण्याची शक्यता शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना परिस्थितीनुसार सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे गुरूवारी अतिवृष्टी झाली असती तर परिस्थितीनुसार मुख्याध्यापकांनी सुट्टी जाहीर केली असती. परंतु शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केल्यामुळे आता अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परिणामी दिवाळी किंवा अन्य सुट्ट्या कमी होण्याची शक्यता आहे.
– प्रशांत रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना.

First Published on: September 20, 2019 6:13 AM
Exit mobile version