नोकरीच्या आमिषाने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी

नोकरीच्या आमिषाने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी

अटक

नोकरीच्या आमिषाने बोलाविलेल्या एका 23 वर्षांच्या कॉलेज तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी मोहम्मद कलीम मोहम्मद हसीन खान या 40 वर्षांच्या आरोपीस शुक्रवारी सायंकाळी येलोगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगाच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. 23 वर्षांची ही तरुणी गिरगाव परिसरात राहत असून चेंबूरच्या एका इंजिनिअर कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षांत शिकते. तिच्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने तिने नोकरी करुन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत तिने तिच्या एका मैत्रिणीला नोकरीविषयी विचारणा केली होती. त्यानंतर तिने तिला मोहम्मद कलीम याचा मोबाईल क्रमांक दिला होता.

तीन दिवसांपूर्वी तिने मोहम्मद कलीमला फोन करुन नोकरीविषयी विचारणा केली होती. यावेळी त्याने तिला आपण भेटून बोलू असे सांगून तिला भाऊचा धक्का बसस्टॉपजवळ बोलाविले होते. शुक्रवारी तीन वाजता ती तिथे गेली. सायंकाळी साडेचार वाजता मोहम्मद कलीम तिथे आला, त्याने तिला जवळच असलेल्या मॅलेट बंदर जंक्शनसमोरील मुंबई कॅफे हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आणले. तिथे गेल्यानंतर त्याने तिला काही पैसे देण्याचा प्रयत्न केला, तिने पैसे घेण्यास नकार दिला असता त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने त्याला जाब विचारुन त्याच्याशी भांडण सुरु केले. हा प्रकार तिथे गस्तीवर असलेल्या येलोगेट पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मोहम्मद कलीमविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांना अटक केली. मोहम्मद कलीम हा एका खाजगी कंपनीत कामाला असून त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: January 14, 2019 4:12 AM
Exit mobile version