रंगमंचाची तिसरी घंटा चिंतेत

रंगमंचाची तिसरी घंटा चिंतेत

शिवाजी मंदिर नाट्यगृह

नाट्यसंस्कृती जपावी व नाट्यरसिकांना दर्जेदार नाटके पाहता यावीत, यासाठी मुंबई, ठाणे यासारख्या शहरामध्ये अनेक नाट्यगृह सुरू करण्यात आली. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तर काही नाट्यगृह नाट्यरसिकांनी मुंबर्सबाहेर स्थलांतर केल्याने अधोगतीला आली आहेत. काही नाट्यगृह ही अनेक वर्षांपासून बंद असल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या नाट्यगृहांची दुरुस्ती करण्यात यावी यसाठी नाट्यरसिकांनकडू मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. काही ठिकाणी नाट्यगृहांची डागडुजी करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तर काही ठिकाणची नाट्यगृांच्यी अवस्था अत्यंय दयनीय झाली आहे. नाट्यगृहांची डागडुजी करून ती अद्ययावत नाट्यगृह रसिकांना मिळावीत अशी मागणी होत आहे. नाट्य रसिकांनी मुंबई बाहेर स्थलांतर केल्याने अनेक नाट्यगृहामध्ये रात्रीचे खेळ होत नाहीत. त्यामुळे अनेक निर्माते फक्त दिवसाला एकच खेळ करतात. त्यामुळे नाटक क्षेत्राला हळूहळू उतरती कळा येऊ लागली आहे.

गडकरी रंगायतनचे भिजत घोंगडे
ठाण्यातील रंगकर्मींसाठी ठाणे महापालिकेच्या मालकीचे घाणेकर नाट्यगृह व गडकरी रंगायतन अशी दोन नाट्यगृहे आहेत. गडकरी रंगायतनची वास्तू 40 वर्षे जुनी असल्याने त्याची नेहमीच डागडुजी करावी लागते. त्यामुळे वास्तू नव्याने बांधावी अशी मागणी नाट्यप्रेमी करत आहेत. गडकरी रंगायतनमध्ये ऐतिहासिक पाऊलखुणा असल्याने वास्तूमध्ये कोणताही बदल करू नये, अशी भूमिका काहीजणांनी घेतली आहे. त्यामुळे गडकरी रंगायतनचा वाद कायम ठेवण्यात ठामपा धन्यता मानत आहे. मागील काही वर्षापासून कोट्यावधीचा खर्च या वास्तूसाठी झाला आहे. कंत्राटदाराकडून केलेल्या कामाची कोणतीही पाहणी तज्ज्ञांकडून करण्यात येत नाही. त्यामुळे तीच तीच कामे करण्यात येत असल्याचा आरोप काही संघटनांकडून होत आहे.

घाणेकर नाट्यगृह वारंवार बंद
हिरानंदानी मेडिकोज या उच्चभ्रू वस्तीमध्ये हिरानंदानीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह उभारून ठामपाच्या स्वाधीन केले. हे नाट्यगृह नवीन असूनही अनेक कारणस्तव बंदच असते. नवीन असूनही सुरुवातीलाच त्याचे मिनी थिएटर दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले. अल्पशा दुरुस्तीसाठी प्रदीर्घ काळ हे मिनी थिएटर बंद होते. त्यामुळे शेवटी कलाकारांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. आंदोलनाची हाक कानावर येताच ठामपाने दिवाळीच्या मुहुर्तावर मिनी थिएटर सुरू केले. इतकेच नव्हे तर केवळ पडदा दुरुस्तीच्या सबबीवर तब्बल दीड वर्षांहून अधिक काळ हे थिएटर बंदच होते. रेल्वे स्थानकापासून नाट्यगृह दूर असल्याने रंगकर्मींचा तिकडे ओढा कमी असतो. मोजकेच कार्यक्रम या ठिकाणी होताना दिसतात.

रवींद्र नाट्य मंदिर 
प्रभादेवी येथे असणारे रवींद्र नाट्य मंदिरात नाट्यरसिकांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. या नाट्य मंदिरात नाटकांचे प्रयोग कमी होतात, पण बर्‍याचदा कार्यक्रमांची रेलचेल असते. रवींद्र नाट्य मंदिरात 911 लोकांची आसन व्यवस्था आहे. या ठिकाणी अनेक खाजगी कार्यक्रमदेखील होतात. पूर्वीसारखी नाटके आता चालत नसल्यामुळे तितकासा पैसा या नाट्यमंदिराला मिळत नाही. तरी हे नाट्यमंदिर अगदी टापटीप आणि नीटनेटके असते. रवींद्र नाट्यमंदिरात आवाजासाठी अत्याधुनिक सामुग्रीबरोबरच उत्तम आसन व्यवस्थाही केली आहे. अनेक छोट्यामोठ्या नाटकांचे प्रयोग दर आठवड्याला इथे होत असतात.

दामोदर नाट्यगृह
परळ रेल्वेस्थानकालगत असलेले दामोदर नाट्यगृह हे वर्षानुवर्षांपासून मुंबईकरांच्या ओळखीचे आहे. या नाट्यगृहात नाटकांच्या मैफिलीबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होतात. नाट्यगृहात बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरतात. नाटकांचे प्रयोग जास्त होत नसले तरी दामोदर नाट्यगृहाने स्वतःची ओळख जपलेली आहे. विशेष म्हणजे या नाट्यगृहात येणार्‍या रसिकांपैकी नाट्यगृहाच्या बाजूला मिळणार्‍या समोशाची खूप स्तुती करतात. येथे उत्तम प्रकारचे समोसे मिळतात.

लहानपणी दामोदर नाट्यगृहाच्या व्यासपीठावर मी स्वतः नृत्य केलेले आहे. त्यामुळे दामोदर नाट्यगृहाशी माझे विशेष नाते आहे. दर पंधरा दिवसातून एकादा नाटकाला न चुकता मी हजेेरी लावते. हा परिसर माझ्या लहानपणापासून ओळखीचा असल्याने मला आल्याशिवाय राहवत नाही.
– शुभांगी माने, दादर

शिवाजी मंदिर नाट्यगृह
दादरमधील शिवाजी मंदिर नाट्यगृहाला नाटक निर्मात्यांची नेहमीच पहिली पसंती आहे. या नाट्यगृहात पहिला प्रयोग केला तर या नाटकाचे यशस्वी शंभर प्रयोग होतात असे निर्मात्यांचे मत आहे. गेल्या काही वर्षात दक्षिण मुंबईतील मराठी नाट्यप्रेमी उपनगर तसेच मुंबईबाहेर गेल्यामुळे येथील मराठी टक्का कमी झाला. परिणामी रात्रीच्या खेळाला प्रेक्षक मिळत नसल्यामुळं हे खेळ रद्द करावे लागत असल्याचे शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे उपाध्यक्ष शशिकांत भालेकर यांनी सांगितले. निवडक मराठी नाटके सोडली तर नाटकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. यामुळे मुंबईतील नाट्यगृहांना उतरती कळा आली आहे. नाट्यगृहाची देखरेख, कर्मचार्‍यांचे वेतन, वीजबिले, पालिका कर हे सर्व भागवण्यासाठी नाट्यगृह व्यवस्थापनाला शाळा, कॉलेज्स आणि खाजगी कंपन्यांना आपल्या वार्षिक कार्यक्रमासाठी ही नाट्यगृह उपलब्ध करून दिली जातात. शिवाजी मंदिरमध्ये पुशबॅक आसने बसवल्याने 1032 वरून आसनव्यवस्था 938 इतकी झाली आहे. 3१ डिसेंबर २०१८ला शिवाजी मंदिर संस्थेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने 75 वी साजरी करण्यात येणार आहे.

पूर्वी नाट्यगृहात नाटक, वाद्यवृंद कार्यक्रमाचे दररोज तीन खेळ होत होते, मात्र आता मोठ्या मुश्किलने दोन खेळ चालतात. त्यातही रात्रीच्या खेळाला प्रेक्षक नसल्यामुळे रद्द करावा लागतो.
– शशिकांत भालेकर, उपाध्यक्ष, शिवाजी मंदिर नाट्यगृह

३4 वर्षांनंतर उभे राहणार अण्णा भाऊ साठे नाट्यगृह
भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) प्राण्यांना त्रास होत असल्याने १९८४ मध्ये अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृह बंद करण्यात आले. त्यामुळे मागील 30 ते 35 वर्षांपासून हे नाट्यगृह बंद होते. खुल्या नाट्यगृहाऐवजी बंदिस्त नाट्यगृह उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. 20 कोटी रुपये खर्च करून याच्या कामाला महापालिकेने सुरुवात केली. मात्र चार वर्षांपासून हे काम कासवगतीने सुरू आहे. 1970 मध्ये राणीबागेसह शिवडी, लालबाग व परळमध्ये खुली नाट्यगृहे बांधून लोककलेसाठी उपलब्ध केली. नाट्यगृहाच्या नूतनीकरणचा निर्णय 2003 मध्ये घेण्यात आला. त्यावेळी अंदाजित खर्च 13 कोटी होता. राज्य सरकार आणि महापालिका निम्मा निम्मा खर्च करणार होते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी यासाठी ६ कोटी 24 लाख देण्याची तयारी दर्शवली. परंतु प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हा खर्च देण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यानंतर 2014 नंतर पुन्हा नूतनीकरणाचा प्रस्ताव बनवला गेला. तोपर्यंत त्याचा खर्च 20 कोटींच्या घरात पोहोचला. 780 आसनांची क्षमता असलेले हे खुले नाट्यगृह बंदिस्त होणार आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकर हे काम पूर्ण करून या नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात येईल, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

कालिदास नाट्यगृह, मुलुंड
पूर्व उपनगरातील नाट्यरसिकांना नाटकांचा आनंद लुटता यावा यासाठी मुलुंड पूर्वेला महापालिकेकडून कालिदास नाट्यगृह उभारण्यात आले. वर्षभरापूर्वी या नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. तेव्हापासून नाट्यप्रेमींना एक चांगले नाट्यगृह मिळत आहे. नाट्यगृहामध्ये अनेक चांगल्या सुविधा असून आसन व्यवस्था, ध्वनीक्षेपणाची व्यवस्था उत्तम आहे. तसेच नाट्यगृहामध्ये मिळणारे खाद्य पदार्थ बाहेरील खाद्य पदार्थांपेक्षा काहीसे महागडे असले तरी त्याचाही दर्जा उत्तम आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातील नाट्यरसिकांना पुन्हा एकदा चांगले नाट्यगृह मिळाले आहे.

कालिदास नाट्यगृहाचे वर्षभरापूर्वी नूतनीकरण केल्यानंतर आता त्यामध्ये उत्तम सुविधा पुरवण्यात येत आहेत. नाटकांप्रमाणेच नाट्यगृहामध्ये मोठ्या प्रमाणात एकांकिका होतात. त्यामुळे परिसरातील नाट्यप्रेमींना नाटकांबरोबरच एकांकीका पाहण्याचीही संधी मिळते.
– मंगेश नलावडे, नाट्यरसिक.

तीन वर्षांपूर्वी नाट्यगृहांची जी अवस्था होती त्यात आता सुधारणा होत आहे. अनेक नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी. दिवसेंदिवस नाटकांच्या संखेत वाढ होत असताना दुरुस्तीसाठी बंद असलेल्या नाट्यगृहांमुळे उर्वरीत नाट्यगृहांवर त्याचा भार येतो. मुंबईतील नाट्यगृह ही महापालिकेच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे त्याची स्वच्छता ही अनेक नाट्यगृहांमध्ये वेळेवर केली जाते. परंतु मुंबई बाहेरच्या नाट्यगृहांवरांच्या अवस्थेवर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात. आम्हाला प्रयोग करताना आणि आलेल्या प्रेक्षकांना प्रयोग बघतांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे केवळ मुंबईच्या नाटयगृहांकडे लक्ष केंद्रित न करता. पुणे, नाशिक, औरंगाबाद येथील नाट्यगृहांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे.
– अविनाश नारकर, अभिनेते

महाराष्ट्रातील नाट्यगृहे ही राज्य सरकार आणि महानगरपालिकांच्या अखत्यारित येतात. खासगी नाट्यगृहांविषयी मला फारसे बोलता येणार नाही. परंतु राज्य सरकार व पालिकेच्या अखत्यारितील नाट्यगृहांकडे आर्थिक फायद्याची साधने म्हणून न पाहता प्रेक्षकांची गरज म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा ही माणसाची गरज आहे तशीच सांस्कृतिक देवाणघेवाण ही माणसाची चौथी गरज आहे. सरकारने ती वेळच्यावेळी भागवली पाहिजे. प्रेक्षक आणि कलाकार यांच्या गरजा लक्षात घेऊन नाट्यगृहांची उभारणी केली पाहिजे. प्रत्येक नाट्यगृहात व्यवस्थापक नेमताना नाट्यकलेशी त्याचा कितपत संबंध आहे याकडेही लक्ष केंद्रित केले पाहिजे. अशाच माणसाची नेमणूक इथे झाली तर नाट्यगृहाबरोबर प्रेक्षकांचा, कलाकारांचा आदर राखला जाईल.
– प्रदीप कबरे, अध्यक्ष, मराठी नाट्यकलाकार संघ

संकलन : नंदकुमार पाटील, सचिन धानजी, विनायक डिगे, नितीन बिनेकर, कृष्णा सोनारवाडकर, संतोष गायकवाड, सुबोध शाक्यरत्न, संचिता ठोसर

छायाचित्र : संदीप टक्के, अमित मार्केंडे

First Published on: December 31, 2018 4:17 AM
Exit mobile version