पिण्याच्या पाण्याने गाड्या धुणार्‍यांवर कारवाई

पिण्याच्या पाण्याने गाड्या धुणार्‍यांवर कारवाई

मुंबईत पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुण्यांसाठी केला जात असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कक्षात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी १० पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु ही पदे निर्माण करण्यास मंजुरी देवून पाच वर्षे होत आली तरी अद्यापही महापालिकेने ही पदे भरलेली नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासन पाण्याच्या मुद्दयावर गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

विशेष कक्षातील पदे अद्याप रिक्त

मुंबईतील मोठ्या प्रमाणात असलेल्या जलजोडण्या तसेच वाढलेल्या झोपडपट्टयांमुळे झालेल्या अनधिकृत जलजोडण्या, सुजाण नागरिकांकडून केले जाणारे बागकाम, गाड्या धुणे, शौचालयातील फ्लशसाठी, खासगी गॅरेज, वाहन दुरुस्ती, गृहनिर्माण संस्थांमधील सुरक्षा रक्षक आणि रस्त्यांवर वाहने धुणार्‍या व्यक्तींकडून पिण्याच्या पाण्याचा सर्रास वापर केला जातो. अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष एखादा कक्ष निर्माण केल्यास ते अधिकारी त्याच कामांवर लक्ष ठेवतील व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दक्षता घेतील. त्यासाठीच २४ विभाग कार्यालयातील अनधिकृत जलजोडण्यासंबंधी व त्या संबंधातील येणार्‍या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यास डिसेंबर २०१४मध्ये मान्यता देवून त्यासाठी १० पदे निर्माण करण्यात आली होती. परंतु ही पदे अद्यापही भरली गेलेली नाहीत.

संबंधित विभागाशी पत्रव्यवहार

ही पदे भरण्यासाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार चालू असून त्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर केली जात असल्याचे जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे. ही पदे भरल्यानंतर विशेष कक्षातील प्रशिक्षित कर्मचारी वर्ग हे अनधिकृत जलजोडण्या संबंधीच्या तक्रारीबाबत योग्य प्रकारे कार्य करू शकेल व महसूलात जास्तीत जास्त वाढ कशी होईल? याबाबतची कार्यवाही करेल, असेही जलअभियंता विभागाने स्पष्ट केले आहे.

First Published on: October 8, 2019 8:19 PM
Exit mobile version