घरचे गणपती असतानाही ‘ते’ तैनात असतात आपल्या सुरक्षेसाठी

घरचे गणपती असतानाही ‘ते’ तैनात असतात आपल्या सुरक्षेसाठी

गिरगाव चौपाटीवर पोलीस बंदोबस्त

राज्यामध्ये आज सर्वत्र गणपती विसर्जनाची धामधुम सुरू असताना यासाठी पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला आहे. सगळ्या सण-समारंभांना नागरीक जल्लोष करत असताना पोलीस मात्र आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात. गणेशोत्सव असो वा नवरात्रौत्सव, ईद, दिवाळी, दहिहंडी सण कोणताही असो बंदोबस्तासाठी पोलीस कायम ऑन ड्युटी असतात. तर काही जीवरक्षकही चौपाट्यांवर २४ तासांपेक्षा जास्त वेळ उपस्थित राहतात. असेच एक गणेशभक्त आपले कर्तव्य बजावण्यासाठी मुंबईत बंदोबस्तासाठी आले आहेत. गिरगाव चौपाटीवर अनेक पोलीस आहेत, जे आपल्या घरातील बाप्पाचे विसर्जन सोडून येथे बंदोबस्तासाठी उभे आहेत.

साताऱ्याला आमच्या गावच्या घरी गणपती असतो. लहानपणापासून घरामध्ये बाप्पा विराजमान होतो. मात्र यंदा मुंबईत आलो आहे. त्यामुळे घरच्या गणपतीच्या मिरवणूक सोहळ्याला जाता आले आहे.
– विक्रम उत्तम गरुड, मुंबई पोलीस (मूळचे साताऱ्याचे राहणारे)

यंदा मुंबई अग्निशमन वाहन चालक म्हणून पोस्टिंग झाली आहे. आमच्याही गावी गणेशोत्सव साजरा करतात. दहा दिवसांचा हा सण असतो. मात्र ड्युटीमुळे जाता आले नाही.
– विशाल उगले, अग्निशमन विभाग (मूळचे साताऱ्याचे राहणारे)

प्रामुख्याने या सणाला गावी असतो. मात्र यावेळी गणपती उत्सवाला सुट्टी मिळाली नाही. गणेशोत्सवाच्या अकरा दिवस घराकडे जाता येत नाही. त्यामुळे इथूनच मवोभावे बाप्पाची पूजा करत आहे. गणेशोत्सव बंदोबस्तासाठी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटीसाठी जावं लागतं. कोणतीही एक जागा निश्चित नसते.
– मारुती पाटील, ट्रॅफिक पोलीस, (मूळचे सांगलीत राहणारे)

आमच्या येथे गेल्या ७ वर्षांपासून ५ ते ६ घरांचा मिळून एक गणपती असतो. सर्व कुटुंबिय मिळून बाप्पाचा पाहुचार करतो. आमच्या गणरायाचे उद्या, सोमवारी विसर्जन होईल. दरवर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन झाल्यानंतर आमच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे आज सकाळपासून ते उद्या दुपारपर्यंत कामावर रुजू राहणार आहे.
– भीमा हनुमंत चव्हाण, जीवरक्षक, वाडी बंदर

First Published on: September 23, 2018 1:40 PM
Exit mobile version