विरोधात बोलल्याने दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींची हत्या – गुलजार

विरोधात बोलल्याने दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींची हत्या – गुलजार

ज्येष्ठ कवी गुलजार

राज्यातल्या अंधश्रध्दा निर्मूलनाचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांची हत्या ते विरोधात बोलले झाली असल्याचे स्पष्ट मत नामवंत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले आहे.

वाईट रुढी, अनिष्ठ परंपरा यांच्या विरोधात ज्यांनी जन्मभर आवाज उठवला, याविरोधात ते सातत्याने बोलले म्हणूनच त्यांना मारण्यात आले, असेही गुलजार यांनी म्हटले आहे. समाजाला दिशा देण्याचे काम या मान्यवरांनी केले. अशा विचारवंतांच्या हत्या होणे ही बाब दुर्दैवी आणि देशाच्या जडणघडणीलाही घातक आहे, असेही गुलजार यांनी म्हटले आहे. गुलजार यांची एक मुलाखत ‘द वॉल’ने घेतली होती. या मुलाखतीत त्यांना समाजात घडलेल्या विचारवंतांच्या हत्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.

देश आणि राज्य बुवाबाजी आणि गंडेबाजीतून सुटावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन हे व्रत मानून त्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांची हत्या ते मॉर्निंग वॉकला गेले असताना २० ऑगस्ट २०१३ ला करण्यात आली. त्यांचे मारेकरी शोधण्यात अद्यापही यश आलेले नाही. एम एम कलबुर्गी हे विचारवंत आणि लेखक होते. धारवाडमध्ये ३० ऑगस्ट २०१५ ला त्यांनाही ठार करण्यात आले, त्यांचे मारेकरीही अद्याप सापडलेले नाहीत. तर गोविंद पानसरे हे डाव्या विचारांचे समर्थक होते. १६ फेब्रुवारीला त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही घटनांबाबत गुलजार यांनी दुःख व्यक्त केल.

प्रवाहाच्या विरोधात जाऊन देशाला वळणावर आणण्याचे काम नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांनी केले. ढोंग आणि लोकांना अंधश्रध्देत लोटणाऱ्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी आपले विचार मांडले, हा त्यांचा गुन्हा ठरला. मान्यवरांची अशा हत्या होणे हे देशाला न शोभणारे कृत्य आहे, असे गुलजार म्हणाले.

First Published on: June 22, 2018 2:00 AM
Exit mobile version