रुग्णाच्या सतर्कतेमुळे रुग्णालयात मोबाईल चोरी करणाऱ्याला अटक

रुग्णाच्या सतर्कतेमुळे रुग्णालयात मोबाईल चोरी करणाऱ्याला अटक

महानगर पालिका तसेच शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाचे मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरी जात असल्याचा अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात घडत असताना एका रुग्णाच्या सतर्कतेमुळे या चोराला पकड्ण्यात सुरक्षा रक्षकाला यश आले आहे. तसेच या चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

नेमके काय घडले?

पालघर जिल्ह्यातील संजय कांबळे हे हृदय विकाराच्या आजारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ४ येथे दाखल आहेत. १५ एप्रिल रोजी रात्री रुग्णाचे नातेवाईक अनिल कांबळे हे रुग्ण संजय कांबळे यांच्या देखरेखीसाठी वॉर्डमध्ये होते. दरम्यान, रुग्णाच्या खाटेजवळ बसलेले अनिल कांबळे यांचा मध्यरात्री डोळा लागला होता. मात्र, पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एक तरुण रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था भेदून त्याने वॉर्ड क्रमांक ४ मध्ये प्रवेश केला. त्यांने झोपलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाचे मोबाईल काढले. त्यानंतर रुग्ण संजय कांबळे यांचे नातेवाईक अनिल कांबळे यांच्या खिशातील मोबाईल काढून पाळ काढणार तेवढ्यात रुग्ण संजय कांबळे यांना जाग आली. त्यांनी मोबाईल फोन चोरी करून पळून जाणाऱ्या चोराच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना जागे वरून हलता येत नव्हतेय. त्यामुळे त्यांनी जोरजोरात चोर चोर म्हणून आरडाओरड करताच त्यांच्या आवाजाने संपूर्ण वॉर्ड जागा झाला. दरम्यान, नातेवाईक अनिल कांबळे यांना देखील जाग येताच त्याने चोराचा पाठलाग करत चोराला वॉर्ड बाहेरील मोकळ्या जागेत पकडून तेथील सुरक्षा रक्षकाच्या ताब्यात दिले.

मोबाईल चोराला केले अटक

सोहेल अयुब शेख (२१) असे ताब्यात घेण्यात आलेल्या मोबाईल चोरांचे नाव आहे. गोवंडीतील गौतम नगर, प्लाँट क्र. १ येथे राहणार सोहेल हा रात्रीच्या सुमारास सायन, केईएम, नायर तसेच सर.जे.जे रुग्णालयात जाऊन मोबाईल चोरी करीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी रुग्णालयांच्या सुरक्षा रक्षकांनी सोहेलला सायन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्यांच्या जवळून एक मोबाईल फोन हस्तगत केला आहे. तसेच या प्रकरणी पुढीत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First Published on: April 17, 2019 10:17 PM
Exit mobile version