पीएमसीचा तिसरा बळी; महिला खातेदाराने केली आत्महत्या

पीएमसीचा तिसरा बळी; महिला खातेदाराने केली आत्महत्या

बोईसरमध्ये मुलाने केली आईची हत्या

आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक बंधने लादल्यानंतर बँकेच्या खातेधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनं, मूक मोर्चा अशा विविध मार्गांनी खातेधारक आपला संताप व्यक्त करत आहेत. अशाच एका आंदोलनात सहभागी झालेल्या ओशिवरा येथील ५१ वर्षीय खातेधारक संजय गुलाटी आणि फत्तेमुल पंजाबी (५९) यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असताना आज एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. योगिता बिजलानी असे या महिलेचे नाव आहे. बिजलानी या पीएमसी बँकेच्या खातेदार असून त्यांच्या खात्यात १ कोटींची रक्कम आहे.

नेमके काय घडले आहे?

अंधेरी येथील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी राहत्या घरी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून डॉ. योगिता बिजलानी या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती वर्सोवा पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, बिजलानी यांच्या आत्महत्येशी बँक घोटाळ्याचा काही संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद करुन घेतली आहे.

यापूर्वीही करण्यात आला होता आत्महत्येचा प्रयत्न

डॉ. योगिता बिजलानी या पतीसोबत अमेरिकेत राहत होत्या. मात्र, त्या काही दिवसांपूर्वी आपल्या १८ महिन्यांच्या बाळासह आई – वडिलांच्या घरी आल्या होत्या. तसेच यापूर्वी देखील त्यांनी अमेरिकेत असताना आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा – पीएमसी घोटाळ्याचा आणखी एक बळी


 

First Published on: October 16, 2019 7:29 PM
Exit mobile version