ते दोघे पथदिव्यांचे करतात ऑडिट; रात्रभर फिरून घेतात शोध

ते दोघे पथदिव्यांचे करतात ऑडिट; रात्रभर फिरून घेतात शोध

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवणारे इरफान मच्छिवाला आणि मुश्ताक अन्सारी हे दोन अवघ्या मुंबईकरांना चांगलेच ओळखीचे झाले आहेत. सामाजिक समस्येवर केवळ ओरडाओरडा करत बसण्यापेक्षा नागरी कर्तव्य म्हणून त्या समस्येचा जमेल तसा निपटारा करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असतात. आता ही जोडी रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर फिरून पथदिव्यांची पाहणी करते. त्यानंतर नादुरुस्त दिव्यांची ते नोंद करतात.

या दोघांनी रात्रीच्या केलेल्या सर्वेक्षणात वांद्य्रातील तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांवरील 206 पथदिव्यांमध्ये त्यांना दोष आढळून आला आहे. अशा प्रकारे हे दोघेजण माहीम, वांद्रे आणि खार हा संपूर्ण परिसर पिंजून काढतात.  या ऑडिटला जाताना इरफानच्या हातात नोंदवही असते, तर मुश्ताक बाईक चालवतो. बाईक हळूहळू चालवत दोघेही माहीम ते वांद्रे परिसराचा धांडोळा घेतात. प्रत्येक पोलजवळ जाऊन त्याच्यातील दोष शोधतात आणि आपला ऑडिट रिपोर्ट तयार करतात. दिवसाला १०० नादुरुस्त पथदिवे शोधण्याचे त्यांनी ठरवले होते, परंतु एकट्या वांद्य्रामध्येच दोन तासात रस्त्यावरील १७० सदोष पथदिवे त्यांना मिळाले.  या जोडीने वांद्रे रिक्लमेशन, माऊंट मेरी रोड, हिल रोड, एस.व्ही. रोड आणि लिंकींग रोड आदी ठिकाणी १७० पथदिवे शोधले. त्यातील १४७ दिवे असे होते की त्याची माहिती कुणाकडेच नव्हती, असेही ते म्हणाले. या पथदिव्यांची जबाबदारी बेस्ट प्रशासनाकडे आहे. मात्र त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

First Published on: September 18, 2018 5:00 AM
Exit mobile version