यंदा साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा

यंदा साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा
मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांनी उंच गणेशमूर्तींच्या तुलनेत ३ फुटांचीच गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना सार्वजनिक गणेशोत्सवात करण्याचा निर्धार केलेला असताना मुंबईतील श्री. गणेशोत्सव स‍मन्वय समितीनेही अशाच प्रकारे घरगुती गणेशमूर्तींचे प्रतिष्ठापना मंडळांमध्ये करण्यात येणार असल्याची ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांना दिली. कोरोनाची सध्यस्थिती लक्षात घेता आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत सार्वजनिक मंडळांची काय भूमिका आहे, हे जाणून घेण्याकरिता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी भायखळा येथील महापौर निवासस्थानी सार्वजनिक गणेशोत्सव स‍मन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.

या बैठकीत सहभागी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पदाधिकाऱ्यांनी यावेळी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला. तसेच काही पदाधिकाऱ्यांनी मुर्तिकारांचे होणारे नुकसान लक्षात घेता मुर्तिकारांच्या पाठीशी शासनाने ठामपणे उभे राहून अनुदान देण्याची मागणी केली. घरगुती श्री. गणेशाची प्रतिष्ठापना करण्यावर अनेकांनी मत व्यक्त केले.

महापौरांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी सहकार्य करण्याचे आवाहन केले.  मुख्यमंत्री यांच्याशी सार्वजनिक गणेश उत्सवाबाबत चर्चा करुन विविध अडचणीबद्दल तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी महापौरांनी दिले. त्यासोबतच एकमताने राज्यशासनाचे पुढील दिशानिर्देश आल्यानंतर त्याप्रमाणे निर्णय घेऊ, असे आश्वासनही महापौरांनी दिले.

याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे (उपनगरे) सचिव डॉ. विनोद घोसाळकर, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष गजानन तोंडवळकर, लालबाग गणेश मंडळाचे मानद सचिव सुधीर, साळवी, उप आयुक्त व गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बरडे तसेच अशोक पवार, रामनाथ केणी, मंगेश दळवी आदी मान्यवर या बैठकीस उपस्थि‍त होते.

First Published on: June 2, 2020 10:49 PM
Exit mobile version